गोवा येथील सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी समष्टी साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड गुरुकृपा !
सौ. मंगला मराठे आणि त्यांचे कुटुंबीय यांनी १९९१ या वर्षी साधनेला आरंभ केला. या साधनाप्रवासात त्यांना वेळोवेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सान्निध्य आणि मार्गदर्शन यांचा लाभ झाला. ‘परात्पर गुरुदेवांच्या प्रथम भेटीतच त्यांची लागलेली ओढ, सतत सहजावस्थेत राहून स्वतःचे वेगळेपण जाणवू न देणारे परात्पर गुरुदेवांचे आगळे वेगळे व्यक्तीमत्त्व, त्यांची शिकवण्याची अनोखी पद्धत; साधक, कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक यांचे त्रास दूर करणारे त्यांचे प्रेम, त्यांच्या प्रीतीवर्षावाची अनुभवलेली व्यापकता, साधकांचे त्रास दूर करून अन् वेळप्रसंगी स्वतः सहन करून त्यांचे सर्वार्थाने रक्षण करणार्या प्रेमळ गुरुमाऊलीचे वात्सल्य आणि या सगळ्यातून अनुभवलेले अध्यात्मशास्त्रातील एक महान शास्त्रज्ञाचे अष्टपैलूत्व’, असे हे परात्पर गुरुमाऊलीच्या समष्टी साधनेसाठी उपयुक्त अवतारी व्यक्तीत्वाचे सारे रेशीमधागे उलगडणारा हा साधनाप्रवास सौ. मंगला मराठे यांनी शब्दबद्ध केला आहे. आपण तो त्यांच्या शब्दांतच अनुभवण्याचा प्रयत्न करूया.
१५ जानेवारी या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांना घडवण्याची आणि शिकवण्याची पद्धत याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
(भाग ४)
भाग ३. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/441505.html
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांमध्ये केलेले पालट
७ अ. साधकांना त्यांच्या गुणदोषांसह स्वीकारून त्यांच्यामध्ये पालट घडवून आणणे : ‘परात्पर गुरु डॉक्टर साधकांना घडवण्यासाठी सतत प्रयत्नरत असतात’, हे मी अभ्यासवर्गाच्या पहिल्या दिवसापासून पहात आले आहे. माझ्या आई-वडिलांनी माझ्या लहानपणी मला प्रेमाने, तर कधी रागावून सुसंस्कारित करण्याचा प्रयत्न केला. माझ्या तरुणपणी त्यांनी मला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी माझे लग्न करून देऊन माझे दायित्व यजमानांकडे हस्तांतरित केले; परंतु परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्यासह अनेक साधकांना त्यांच्या अनेक गुण-दोषांसह स्वीकारले आहे. त्यांनी साधकांच्या स्वभावदोषांमुळे होणारे त्रास स्वतः सहन करून चिकाटीने साधकांमध्ये पालट घडवून आणले. त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या आम्हा सर्व साधकांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देऊन त्यासाठी लागणारे सर्व साहित्यही आम्हाला उपलब्ध करून दिले. त्यांनी आम्हाला ‘स्वयंपाक करणे, संगणक हाताळणे, वाहन चालवणे’, हेही शिकवले.
७ आ. साधिकेला दुचाकी आणि चारचाकी शिकण्यास सांगणे : मी अधिकोषात सेवारत असतांना मला परात्पर गुरु डॉक्टरांनी दुचाकी घेऊन स्वावलंबी होण्यास उद्युक्त केले होते. मी दुचाकीवरून प्रवास केल्याने ‘माझा वेळ कसा वाचेल ?’, हे त्यांनी मला पटवून दिले. त्यामुळे मी धामसे ते फोंडा दुचाकीने प्रवास करू लागले. परात्पर गुरु डॉक्टरांनी मला चारचाकीही शिकून घेण्यासाठी सांगितले; पण मी ते गांभीर्याने मनावर घेतले नव्हते. त्यानंतर पुढे २ मासांनी त्यांची भेट झाल्यावर त्यांनी मला ‘चारचाकी शिकलीस ना !’, असे विचारले. मला चारचाकी चालवण्याची भीती वाटत होती आणि मी माझ्या भीतीवर मात करू शकले नव्हते. त्यानंतरच्या पुढच्या भेटीत परात्पर गुरु डॉक्टर मला म्हणाले, ‘‘बायकांनाही चारचाकी चालवता आली पाहिजे. नवर्याला केवळ तुमचा चालक (ड्रायव्हर) बनवून ठेवू नका. तुम्हीही स्वावलंबी व्हायला हवे.’’
७ इ. ‘अधिक वेळ सेवा करून थकलेल्या साधकांची झोप आणि विश्रांती व्हावी’, याची काळजी घेणे : वर्ष १९९३ मध्ये मी आणि माझे यजमान मुंबई येथील सेवाकेंद्रात गेलो होतो. मी साधकांना भेटण्याच्या ओढीने भरभर जिना चढून वर गेले. सकाळचे ७.३० वाजले होते. आम्ही तेथे पोचल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी आमचे स्वागत केले आणि आम्हाला सांगितले, ‘‘त्या खोलीतील साधकांना उठवू नका; कारण ते रात्री २ वाजेपर्यंत सेवा करत होते.’’ कुणी साधक नामजपाला बसला असेल किंवा झोपला असेल, तर ‘त्याला त्रास न होता आवाज न करता तेथून कसे बाहेर जायचे ?’ हे त्यांनीच आम्हाला शिकवले.
७ ई. मुंबईतील गर्दीच्या वेळी एकट्याने रेल्वेचा प्रवास करण्याची भीती वाटणार्या आधुनिक वैद्य मराठे यांना लोकलचे तिकीट काढण्यापासूनची संपूर्ण माहिती सांगून त्यांची भीती घालवणे : वर्ष १९९५ मध्ये आम्ही एका नातेवाइकांच्या मुलाच्या बारशासाठी मुंबईला गेलो होतो. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी गोव्याला दूरभाष करून मुंबईतील आमचा दूरभाष क्रमांक मिळवला आणि यजमानांना मुंबईच्या रेल्वेचा प्रवास करून मुंबईत होणार्या अभ्यासवर्गाला जाण्यास सांगितले. यजमान गोवा सोडून कधीही बाहेर कुठेही फिरले नव्हते. त्यामुळे त्यांना रेल्वेने प्रवास करण्याची भीती वाटत होती. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना ‘रेल्वेचे तिकीट कसे काढायचे ? लोकलमध्ये कसे चढायचे ? कसे बसायचे ? कुठे उतरायचे ?’ इत्यादी सर्व माहिती सविस्तर सांगून मालाड ते माटूंगा प्रवास करण्यास त्यांना उद्युक्त केले. तेव्हापासून यजमानांच्या मनातील रेल्वे प्रवास करण्याची भीती कायमची गेली. त्यानंतर पुढे काही वर्षे ते भारताच्या अनेक राज्यांतून अध्यात्मप्रसाराच्या सेवेसाठी रेल्वेने एकटे फिरले. आता ते त्यात निष्णात झाले असून इतरांना रेल्वेच्या प्रवासाविषयी माहिती सांगतात.
७ उ. ‘पुढे येणार्या भीषण आपत्काळात बर्याच गोष्टी नसतील त्या गोष्टी नंतर पहायला मिळणार नाहीत’, असे सांगून एक सहलीचे ठिकाण पहायला पाठवणे आणि झोपाळ्यात बसण्याची भीती घालवणे : एकदा आम्ही सहसाधकांसमवेत सहकुटुंब मुंबईला गेलो होतो. मुंबईला गेल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला एका सहलीच्या ठिकाणी जाण्यास सांगितले. आमची कुणाचीही तिकडे जायची इच्छा नव्हती; कारण मुले लहान होती आणि आम्हाला तेथील उंच उंच झोपाळ्यात बसायची, तसेच तेथील खेळ खेळण्याची भीती वाटत होती. त्यांच्या तिकिटांचे मूल्यही पुष्कळ होते. त्यामुळे आम्हाला ‘तिथे जायला नको’, असे वाटत होते. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘मी इंग्लंडला असतांना अशा ठिकाणी जाऊन आलो आहे. पुढे हे सर्व नसेल. आपल्याला पहायलाही मिळणार नाही.’’ परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला हे सर्व पटवून दिले आणि आग्रहाने तिथे जाण्यास सांगितले. त्यामुळे आम्ही तिथे जाण्यास सिद्ध झालो. तिथे उंच उंच झोपाळे होते. आम्हाला त्या झोपाळ्यात बसण्याची भीती वाटत होती; परंतु हळूहळू आमची ही भीती न्यून झाली.
तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक गोष्टीतून आपल्याला अध्यात्मच शिकवत असतात’, हे आमच्या लक्षात आले. त्यांच्यामुळे आमची त्या खेळण्यांविषयी असलेली भीती नाहीशी झाली होती.
८. संत भक्तराज महाराज यांच्याविषयी शिष्य डॉ. आठवले यांचा अनन्य भाव !
८ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतः गुरुपदावर असूनही सतत शिष्यभावात रहाणे आणि सर्वकाही प.पू. भक्तराज महाराज यांच्या कृपेमुळेच होत असल्याचे सांगणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला अध्यात्मशास्त्र अतिशय विस्तृतपणे तात्त्विक आणि प्रायोगिक स्तरावर शिकवले; मात्र हे शिकवतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला कधीच त्यांच्यामध्ये अडकू दिले नाही. परात्पर गुरु डॉक्टर नेहमी शिष्यभावात राहून ‘हे सर्व त्यांचे श्री गुरु संत भक्तराज महाराज यांच्या (प.पू. बाबांच्या) कृपेनेच होत आहे’, असे आम्हाला सांगायचे.
८ आ. साधकांना कशातही, म्हणजे अगदी स्वतःतही अडकू न देणे आणि ‘गुरु हे तत्त्वस्वरूप आहेत’, हे साधकांच्या मनावर बिंबवणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला प.पू. बाबांच्या भजनांचा पूर्णतः आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेण्यास शिकवले; परंतु त्यांनी आम्हाला केवळ भजने म्हणण्यात अडकू दिले नाही. त्याच्या पुढच्या टप्प्याची साधना करण्यास उद्युक्त केले. त्यांनी आम्हाला कधी स्वतःतही अडकू दिले नाही. ‘श्री गुरु म्हणजे शरीर नव्हे, तर तत्त्व आहे. व्यष्टी आणि समष्टी’ अशा दोन्ही साधना केल्यास गुरुकृपा होणारच आहे’, असे परात्पर गुरु डॉक्टर आमच्या मनावर बिंबवत होते.
८ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा गुरूंप्रतीचा भाव : स्वतः गुरुपदावर असूनही परात्पर गुरु डॉक्टरांनी शिष्यभावात राहून त्यांचे गुरु संत भक्तराज महाराज यांची शेवटपर्यंत अनन्यभावाने सेवा केली. परात्पर गुरु डॉक्टर नेहमी अभ्यासवर्गांना आरंभ करतांना, एखादी अनुभूती सांगतांना किंवा कोणतेही नवीन सूत्र शिकवतांना प्रथम त्यांच्या गुरूंचे स्मरण करत असत.
८ ई. स्वतः गुरुपदावर असूनही स्वतःची कामे स्वतःच करणे : परात्पर गुरु डॉक्टर स्वतः गुरुपदावर असतांनाही तसे कधीच वागत नसत. ते स्वतःची कामे स्वतःच करत. ते नेहमी शिष्यभावातच वावरत असत आणि आताही ते शिष्यभावातच असतात.
९. कांदळी आश्रमातील वास्तव्य आणि शिकायला मिळालेली सूत्रे
९ अ. साधकांना आश्रमजीवन अनुभवता यावे, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांना रामनवमीनिमित्त प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी येथील आश्रमात घेऊन जाणे : एप्रिल १९९२ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला ‘श्री गुरु कसे असतात ? आश्रम कसा असतो ? भंडारा म्हणजे काय ? आश्रमजीवन कसे असते ?’, हे प्रत्यक्ष अनुभवता येण्यासाठी प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी येथील आश्रमात नेले होते. रामनवमीनिमित्त तेथे भंडारा असून प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शनही होणार होते. गोव्याहून दोन चारचाकी गाड्या भरून आम्ही साधक रामनवमीच्या उत्सवासाठी कांदळीला गेलो होतो. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रवासाच्या आरंभापासून ते शेवटपर्यंत अनेक गोष्टी आम्हाला शिकवल्या. प्रत्येक क्षणी त्यांनी पुढीलप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करून अध्यात्म जगायला शिकायला मिळाले.
(क्रमश: उद्याच्या अंकात)
– सौ. मंगला मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.४.२०१७)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
भाग ५. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/442225.html