कोरोना लसीकरणाच्या पहिल्या दिवशी ७ केंद्रांमध्ये ७०० आरोग्य कर्मचार्यांना लस देणार
पणजी, १५ जानेवारी (वार्ता.) – कोरोना लसीकरणाच्या १६ जानेवारी या पहिल्या दिवशी गोव्यात ७ केंद्रांमध्ये एकूण ७०० आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘२ खासगी आणि ५ सरकारी रुग्णालये मिळून एकूण ७ केंद्रांमध्ये कोरोना लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.प्रत्येक केंद्रामध्ये प्रत्येकी १०० आरोग्य कर्मचार्यांना लस दिली जाणार आहे. मणिपाल आणि ‘हॅल्थवे’ या २ खासगी रुग्णालयांसमवेतच ५ सरकारी रुग्णालयांमध्ये लसीकरणाचा कार्यक्रम होणार आहे.’’
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता (डीन) डॉ. शिवानंद बांदेकर म्हणाले, ‘‘गोवा वैद्यकीय महाविद्यालयाशी निगडित सुमारे ५ सहस्र कर्मचार्यांना पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस दिली जाणार आहे, तसेच गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना प्रभागात काम करणार्या स्वच्छता कर्मचार्यांनाही पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस दिली जाणार आहे.’’