राज्यातील शाळा बंद असतांना शाळांसाठी स्वयंपाकघर साहित्याच्या खरेदीसाठी ७८ कोटींची निविदा प्रक्रिया
पुणे – शिक्षण विभागाकडून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि शासन अनुदानित शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबवली जाते. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेत भोजन दिले जाते; मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद असतांना शाळांसाठी स्वयंपाकघर साहित्याच्या खरेदीसाठी ७८ कोटींची निविदा प्रक्रिया प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून राबवण्यात आली आहे. शालेय पोषण आहाराचे लाभार्थी असलेले विद्यार्थी शाळेत येत नसल्याने आहार शाळांमध्ये शिजवलाच जात नाही. त्यामुळे निधीची चणचण असतांना आणि शाळा बंद असतांना ताटवाटयांची खरेदी कशासाठी ?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याविषयी एका वृत्त संकेतस्थळावर बातमी प्रसिद्ध झाली आहे. (असे आहे, तर संबंधितांची चौकशी का करण्यात येऊ नये ? – संपादक)
शाळा चालू करण्याविषयी राज्य सरकार योग्य वेळी निर्णय घेईल. त्या वेळी स्वयंपाकाचे साहित्य शाळांना आवश्यक आहे. तसेच या साहित्याची खरेदी करून ५ वर्षे होऊन गेल्याने बर्याच ठिकाणचे हे साहित्य खराब झाले आहे. त्यामुळे शाळांना नविन साहित्य दिले जाणार आहे, असे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी सांगितले.