भुयारी रस्त्याचे होणार आता शासकीय उद्घाटन !
सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची माहिती
सातारा, १५ जानेवारी (वार्ता.) – येथील बहुचर्चित भुयारी रस्त्याचे (ग्रेड सेपरेटरचे) उद्घाटन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नुकतेच केले. यामुळे जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींच्या भुवया उंचावल्या होत्या. आता याच भुयारी रस्त्याचे शासकीय उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पुन्हा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
अनुमाने ७५ कोटी रुपये व्यय करून हा भुयारी रस्ता बांधण्यात आला आहे. खासदार भोसले यांनी उद्घाटन केले असले, तरी अद्याप बांधकाम विभागाने बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिलेले नाही. तसेच या भुयारी रस्त्याची देखभाल-दुरुस्ती कोण करणार ?, याविषयी कोणतेही नियोजन झालेले नाही. या सर्व तांत्रिक गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर भुयारी रस्त्याचे शासकीय उद्घाटन होणार आहे. याविषयी बांधकाम विभागाला लवकरात लवकर योग्य तो दिवस निवडण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या भुयारी रस्त्यातून वाहतूक चालू असून नागरिकांना कोणकोणत्या अडचणी येत आहेत, हे विचारात घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्यात येतील. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी भुयारी रस्त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात येणार आहेत.