शासनाच्या सर्व विभागांत मराठीचा वापर व्हावा ! – सुभाष देसाई
मुंबई – केंद्र सरकारच्या कार्यालयातील कारभार मराठी भाषेतून व्हावा, असे केंद्र सरकारचे धोरण आहे. या धोरणाची कार्यवाही होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी येथे केले. मराठी भाषा विभाग आणि अन्य संस्थां यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सुभाष देसाई पुढे म्हणाले की, प्रत्येक विभागातील कारभार मराठीत झाला पाहिजे. बँक, पोस्ट, रेल्वे या ठिकाणी मराठी भाषेमधून व्यवहार व्हावा, यासाठी आग्रह धरला पाहिजे. मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढे चालवण्याची आवश्यकता असून यासाठी ‘मराठी बोला, मराठीतून व्यवहार करा व मराठीचा आग्रह धरा’ असे आवाहन देसाई यांनी केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने १४ ते २८ जानेवारी या कालावधीत राज्य शासनाच्या वतीने ग्रंथप्रदर्शन, अभिवाचन स्पर्धा आणि मराठी प्रश्नमंजुषा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी मराठी भाषेसाठी वेगवेगळ्या प्रकारे योगदान देणारे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे आणि अन्य अधिकारी यांना देसाई यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मिती ग्रुप यांच्या माध्यमातून १४ ते २८ जानेवारी दरम्यान मराठी भाषेची महती सांगणाऱ्या डिजिटल सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज मंत्रालयात या उपक्रमाचे उद्घाटन केले. pic.twitter.com/I4YShwJanq
— Subhash Desai (@Subhash_Desai) January 14, 2021