आजपासून देशभरात कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्रारंभ
नवी देहली – उद्या, १६ जानेवारीपासून देशात कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाला प्रारंभ होणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या दिवशी अनुमाने ३ लाख आरोग्य कर्मचार्यांना लस दिली जाईल. रुग्णालयांतील इतर वैद्यकीय सेवा बाधित होऊ नयेत, यासाठी जानेवारीत एकूण १० दिवसच लसीकरण होईल. ते १० दिवस कोणते असतील, याचा निर्णय राज्यांना घ्यायचा आहे. आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकार्याच्या मतानुसार सलग लसीकरणामुळे कर्मचारी थकतील. काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश येथे आरोग्य कर्मचार्यांची संख्या अल्प असल्याने सलग १५ दिवस लसीकरणाची आवश्यकता भासणार नाही. यामुळे १० दिवसच लसीकरण मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
(सौजन्य : The Economic Times)
१. प्रत्येक केंद्रावर एका दिवसात १०० जणांना लस दिली जाईल. १० दिवसांपर्यंत देशात अनुमाने २ सहस्र ९३४ लसीकरण केंद्रे असतील. नंतर ती ५ सहस्रांंवर नेली जातील. यानंतर प्रतिदिन ५ लाखांवर लोकांना लस टोचली जाईल.
२. संसर्गजन्य आजार, सर्दी, खोकला, ताप असलेल्यांना लस घेण्यास मनाई आहे. ज्या लोकांकडे ‘अँड्रॉइड’ फोन नाही, ते त्यांचे कुटुंबीय, मित्र आदींचा फोन वापरू शकतात; कारण दोन्ही डोसचे लसीकरण झाल्यानंतर याच भ्रमणभाष क्रमांकावर एक ‘क्यूआर कोड’ येणार आहे. यामुळे लस टोचल्यानंतर मिळणारे प्रमाणपत्र ‘डाऊनलोड’ करता येणार आहे.