चीनची लस परिणामकारक नसल्याने ब्राझिलने भारताकडे मागितली कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस !
लसीच्या निर्यातीचे धोरण अद्याप ठरले नसल्याने भारताकडून प्रतिसाद नाही !
नवी देहली – भारताकडे अनेक देशांनी भारत-निर्मित कोरोना लसींची मागणी केली आहे; मात्र सध्या लसींची निर्यात करण्यासंदर्भात कोणतेही धोरण ठरले नसल्याने भारताने ब्राझिलच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही. दुसरीकडे कोरोनाच्या लसी घेऊन जाण्यासाठी ब्राझिलने विशेष विमान भारतात पाठवण्याची सिद्धता चालू केली आहे. भारत-निर्मित लसीमध्ये ‘सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया’च्या ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘भारत बायोटेक’च्या ‘कोव्हॅक्सिन’ या लसींचा समावेश आहे.
ब्राझिलमध्ये सध्या चिनी बनावटीच्या कोरोना लसीचा वापर करण्याचा विचार चालू आहे; मात्र ‘सिनोव्हॅक बायोटेक’ची निर्मिती असणारी ही कोरोनाची लस केवळ ५०.४ टक्के परिणामकारक असल्याचे ब्राझिलमधील ‘क्लिनिकल ट्रायल’मध्ये समोर आले आहे. या लसीसंदर्भात करण्यात आलेल्या संशोधनामध्ये पूर्वी ही लस जितकी प्रभावशाली वाटली होती, त्यापेक्षा ती निश्चितच अल्प परिणामकारक आहे. त्यामुळे या लसीला अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही. चिनी लसीचा फारसा परिणाम दिसत नसल्यानेच ब्राझिलने ‘सीरम’शी करार केला असून आता त्यांनी तातडीने २० लाख लसींची मागणी केली आहे; मात्र जोपर्यंत भारत सरकार लसीच्या निर्यातीला अनुमती देत नाही, तोपर्यंत या लसींचा पुरवठा करता येणार नाही.