कराड (जिल्हा सातारा) येथे अत्यंत उत्साहात पार पडला शिवस्पर्शदिन
सातारा, १४ जानेवारी (वार्ता.) – अफजलखान वधानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी विश्रांती न घेता पन्हाळगडापर्यंत आदिलशाही भाग त्वरेने कह्यात घेतला. त्या वेळी मार्गशीर्ष वद्य तृतीयेला छत्रपती शिवाजी महाराज यांनी कराड शहर जिंकले आणि कृष्णा नदी आणि कोयना नदी यांच्या संगमामध्ये स्नान करून श्रीउत्तरालक्ष्मी देवीचे पूजन केले. या ऐतिहासिक आणि स्फूर्तिदायक घटनेचे स्मरण करण्यासाठी कराड येथील शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे आगमन झाले तो दिवस अर्थात शिवस्पर्शदिन अत्यंत उत्साहात पार पाडला.
प्रारंभी प्रतापगड उत्सव समितीचे निमंत्रक तथा समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्या शुभहस्ते कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पूर्णाकृती मूर्तीचे पूजन करण्यात आले. नंतर मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी या घोषणांनी वातावरण शिवमय झाले. या वेळी मनसेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण, विनायक भोसले, महिला आघाडीप्रमुख सौ. गावडे, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज राजेंद्र मोहिते, चंद्रकांत पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मार्गशीर्ष वद्य तृतीया अर्थात शिवस्पर्शदिन म्हणजे कराडचा प्रथम स्वातंत्र्यदिनच होय. हा दिवस प्रतिवर्षी साजरा करण्यात यावा, असे आवाहन मिलिंद एकबोटे यांनी उपस्थितांना केले. शिवभक्त राजेंद्र घारे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतल्याने हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंदजी गांधी आणि मिलिंद एकबोटे यांच्या शुभहस्ते सवत्स धेनूची मूर्ती देऊन विशेष अभिनंदन करण्यात आले.