ताळगाव पंचायतीचा पणजी महानगरपालिकेत समावेश करणार नाही ! – जेनिफर मोन्सेरात, माहिती तंत्रज्ञान मंत्री
पणजी, १४ जानेवारी (वार्ता.) – ताळगाव पंचायतीचा पणजी महानगरपालिकेत समावेश करण्यात येणार नाही, अशी माहिती ताळगावच्या आमदार तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी दिली. मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. त्या ट्वीटमध्ये म्हणतात, ‘‘मी ताळगाववासियांना आश्वस्त करू इच्छिते की, ताळगाव पंचायतीचा पणजी महानगरपालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव पणजी महानगरपालिकेकडे सध्या आलेला नाही.’’
पणजी महानगरपालिकेच्या सर्व ३० प्रभागांचे सुसूत्रीकरण होणार
पणजी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या सर्व ३० प्रभागांचे सुसूत्रीकरण होणार आहे. ही प्रक्रिया १९ जानेवारी २०२१ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. पणजी शहराची भौगोलिक पार्श्वभूमी आणि जनसंख्या किंवा मतदारांची संख्या या आधारावर प्रभागांचे सुसूत्रीकरण चालू आहे, अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिली.
पणजी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत ८० टक्के नवीन चेहरे ! – बाबुश मोन्सेरात, आमदार
विद्यमान महापौर उदय मडकईकर यांनाही उमेदवारी नाही
पणजी – महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत ८० टक्के नवीन चेहरे असतील. विद्यमान नगरसेवकांना उमदेवारी दिली जाणार नाही. विशेष म्हणजे पणजी महानगरपालिकेचे विद्यमान महापौर उदय मडकईकर यांनाही उमेदवारी दिली जाणार नाही, तर त्यांच्या मुलाला या वेळी उमेदवारी दिली जाणार आहे. प्रभागांच्या आरक्षणाविषयी घोषणा झाल्यानंतर उमेदवारी घोषित करण्यात येणार असल्याची माहिती पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी दिली.