महिलांनी कायद्यांचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक ! – अधिवक्त्या सौ. अमृता मोंडकर
मालवण – देशात महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना वाढत आहेत. महिला आणि मुलींना संरक्षण, तसेच न्याय मिळवून देण्यासाठी कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५, पोटगी कायदा, घटस्फोट कायदा, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आदी कायदे देशात अस्तित्वात आहेत. त्यामुळे महिलांनी या कायद्याचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अधिवक्त्या सौ. अमृता मोंडकर यांनी केले. त्या बॅ. नाथ पै सेवांगण संचलित कौटुंबिक सल्ला केंद्र, मालवण यांच्या वतीने आयोजित सावित्रीबाई फुले यांच्या १८९ व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत पोईप येथे १३ जानेवारी दिवशी ‘कायदेविषयक मार्गदर्शन आणि जाणीवजागृती’ अन् ‘महिलांचे आरोग्य’ या विषयांवरील कार्यक्रमात बोलत होत्या. या कार्यक्रमाचा शुभारंभ पोईपच्या सरपंच सौ. गिरिजा पालव यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अन् दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी केले. या वेळी त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती करून दिली. या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून अधिवक्ता अमृता मोंडकर आणि डॉ. गार्गी ओरसकर या उपस्थित होत्या. ‘कौटुंबिक सल्ला केंद्राची कार्यपद्धत’ याविषयी सल्ला केंद्राचे समुपदेशक मनोजकुमार गिरकर आणि अदिती कुडाळकर यांनी उपस्थित महिलांना माहिती दिली. या वेळी डॉ. गार्गी ओरसकर यांनी ‘महिला आणि आरोग्य’ या विषयावर उपस्थित महिला वर्गाशी संवाद साधला.
या वेळी बॅ. नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर, मालवण यांच्या वतीने गोळवण येथे नव्यानेच चालू झालेल्या जीवनज्योती या ग्रंथालयास शुभेच्छापर पुस्तकांची भेट देण्यात आली. या कार्यक्रमास मसदे चुनवरे ग्रामपंचायत प्रशासक संजय गोसावी यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.