‘कोरोना’च्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जात मानवाला साहाय्यभूत ठरणारे ज्ञान जगभरात पोचवणारे एस्.एस्.आर्.एफ्. संकेतस्थळ !
एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त…
‘१४.१.२०२० या दिवशी, म्हणजे मकरसंक्रांतीच्या दिवशी ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या संकेतस्थळाचा १५ वा वर्धापनदिन झाला. गेल्या वर्षाच्या आरंभी ‘हे वर्ष कसे असेल ?’, याविषयी कुणालाच कल्पना नव्हती. ‘कोरोना’ महामारीच्या पार्श्वभूमीवर असलेले जग मात्र वर्ष २०२१ मध्ये मात्र गतवर्षीपेक्षा बरेच वेगळे आहे. या आव्हानात्मक परिस्थितीला ईश्वराच्या कृपेने सामोरे जात साधक एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावरील सध्याच्या काळाला आवश्यक असलेले आणि मानवाला साहाय्यभूत ठरणारे ज्ञान जगभरात पोचवण्यासाठी अथक प्रयत्नरत आहेत. कालच्या लेखात आपण संकेतस्थळ पहाणार्यांची संख्या ५ कोटी ८० लाखांहून अधिक असणे, ‘लाईव्हस्ट्रीम (थेट प्रसारण)’ आणि ‘ऑनलाईन’ कार्यशाळांचे आयोजन अन् सध्याच्या आपत्काळात साहाय्यभूत ठरलेले एस्.एस्.आर्.एफ्.चे लेख आणि चलत्’चित्रे (व्हिडिओज्) यांविषयी माहिती वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग २)
लेखाचा १ भाग पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/441230.html
६. ‘आध्यात्मिक नेतृत्व’ या विषयावरील प्रवचनाने प्रभावित होऊन प्रख्यात व्यावसायिक नेत्यांनी अध्यात्मात रस दाखवणे
एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. हान्स मार्टिन हेअर्लिंगे हे एक उद्योजक असून ते सक्षम अर्थव्यवस्थेसाठी कार्यरत असणार्या ७० आस्थापनांच्या ‘पॅनेल’सह अनेक आस्थापनांच्या मंडळाचे सदस्य आहेत, तसेच सक्षम आणि सामाजिक दायित्व या संदर्भातील विविध विद्यापिठांच्या संपर्कात आहेत. त्यांनी स्वतःच्या आध्यात्मिक शोधाचा एक भाग म्हणून आध्यात्मिक संशोधन केंद्र असलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला दोनदा भेट दिली. श्री. हान्स यांनी एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावरील दैवी ज्ञान प्रख्यात व्यावसायिक नेत्यांपर्यंत पोचवण्यासाठी विविध संधी उपलब्ध करून देऊन साहाय्य केले. ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या समवेत श्री. हान्स यांनी ‘पीस ऑन स्नो’ या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि यातून एस्.एस्.आर्.एफ्.ला ‘लाईव्हस्ट्रीम’वर ‘आध्यात्मिक नेतृत्व’ हा विषय सादर करण्याची दुसरी संधी मिळाली. हा कार्यक्रम आता संकेतस्थळाच्या यू ट्यूब वाहिनीवर ठेवण्यात आला आहे.
श्री. हान्स यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’ला उपस्थित असलेल्या प्रतिनिधींसमोर ‘आध्यात्मिक नेतृत्व’ हा विषय मांडण्याची संधी मिळाली. एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. शॉन क्लार्क यांनी विषयाचे सादरीकरण केले. ‘आध्यात्मिक तत्त्वांवर आधारित धर्मशास्त्रानुसार जगाने नेतृत्वाविषयी कसा विचार करायला हवा ?’, याविषयी सांगण्यात आल्याने उपस्थितांकडून याला चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रवचनातील माहिती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनावर आधारित होती. श्री. शॉन क्लार्क यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे उदाहरण दिले, ज्यांच्या नेतृत्वामुळे केवळ मनुष्यातच नव्हे, तर निर्जीव वस्तू आणि वातावरण यांतील आध्यात्मिक स्पंदनांमध्ये सकारात्मक पालट घडत आहेत, जी आजच्या काळाची आवश्यकता आहे.
हा कार्यक्रम अनेक लोकांमध्ये एस्.एस्.आर्.एफ्.च्या आध्यात्मिक संशोधन कार्यात रस निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी ठरला असून अनेकांनी साधना करण्यासही आरंभ केला. पुढे सूचीबद्ध प्रमुख उद्योजकांनी साधना करण्यास आणि नियमित सत्संगाला उपस्थित रहाण्यास आरंभ केला आहे. उपस्थितांतील काही जण त्यांच्या समुदायांतील अतिशय प्रमुख व्यक्ती, उदा. श्रीमंत व्यापारी, उद्योजक, संशोधक असून काही जण जन्मजात उच्च कुटुंबांतील आहेत.
६ अ. एस्.एस्.आर्.एफ्.च्या सत्संगांना उपस्थित रहाणारे उद्योजक नेते
१. श्री. रॉयस्टन फ्लूड
२. श्रीमती मारियम आझाम
३. श्री. क्रिस्टन होसलमन
४. डॉ. अशोककुमार एम्. पटेल
५. श्री. मार्सेलो गार्सिया
६. सौ. सुझान हम्बेल-हेअर्लिंगे (श्री. हान्स मार्टिन हेअर्लिंगे यांची बहीण)
६ आ. या सत्संगातून एस्.एस्.आर्.एफ्.साठी उपलब्ध झालेल्या नवीन संधी
१. सद्गुरु सिरियाक वाले आणि साधक ‘ओकीटॉक’ नावाच्या जर्मन ‘रेडिओ’ कार्यक्रमात नियमितपणे बोलत असून त्याला सहस्रो श्रोते लाभले आहेत.
२. भावी नेतृत्व सिद्ध होण्याच्या दृष्टीने श्री. हान्स मार्टिन हेर्लिंग यांचे मित्र किशोरवयीन मुलांसाठी एका विशेष आंतरराष्ट्रीय सत्संगाचे आयोजन करण्यास साहाय्य करत आहेत.
३. ‘युनायटेड नेशन्स’मध्ये नोंदणीकृत प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्थेमध्ये विषयाचे सादरीकरण
४. ‘अल्ट्रू इन्स्टिट्यूट’ ही एक आंतरराष्ट्रीय सदस्यता असलेली संस्था असून यात समाजातील विविध प्रमुख सदस्यांचा समावेश आहे. येथेही एस्.एस्.आर्.एफ्.ला विषयाचे सादरीकरण करण्याची संधी मिळाली.’
७. ‘न्यू इव्हेंटस् (नवीन उपक्रम)’ पान
‘या वर्षी एस्.एस्.आर्.एफ्.च्या वतीने आयोजित करण्यात येत असलेले उपक्रम आणि कार्यक्रम यांची माहिती देणार्या ‘न्यू इव्हेंटस् (नवीन उपक्रम)’ या पानाचा आरंभ करण्यात आला आहे. दिवसेंदिवस एस्.एस्.आर्.एफ्.च्या कार्याचा विस्तार होत आहे. त्यामुळे या विस्तारित कार्याची योग्य ती माहिती मिळण्याच्या दृष्टीने हे पान विकसित करण्यात आले आहे. ‘जिज्ञासूंना वापरण्यासाठी सुलभ जावे, तसेच त्यांना स्वतःच्या आवडीनुसार कार्यशाळा आणि सत्संग शोधून त्यानुसार नावनोंदणी करता यावी’, या दृष्टीने या संकेतस्थळाची रचना करण्यात आली आहे.
८. विविध सामाजिक माध्यमे
एस्.एस्.आर्.एफ्.ची १९ सामाजिक माध्यमे (सोशल मेडिया चॅनेल्स्) आहेत.
८ अ. फेसबूक : तमिळ, हिंदी, इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन, इंडोनेशियन, रशियन, इटालियन आणि क्रोएशियन
८ आ. पिंटरेस्ट : इंग्रजी, स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन आणि इंडोनेशियन
८ इ. ट्विटर : इंग्रजी
८ ई. इन्स्टाग्राम : इंग्रजी
८ उ. वीकॉनटक्टी : रशियन
एस्.एस्.आर्.एफ्.चे ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’, ‘ट्विटर’, ‘यू ट्यूब’ आणि ‘पिंटरेस्ट’ या सर्व वाहिन्यांच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या सदस्यांची संख्या ३ लाखांहून अधिक आहे. प्रत्येक मासात ‘फेसबूक’, ‘इन्स्टाग्राम’ आणि ‘यू ट्यूब’ या माध्यमांतून विचारल्या जाणार्या २०० शंकांना वा प्रतिक्रियांना उत्तरे दिली जातात. यावर्षी इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषांतही ‘पिंटरेस्ट’ या वाहिनीचा, तसेच तमिळ आणि इटालियन या भाषांत ‘फेसबूक’ पानांचा आरंभ करण्यात आला. प्रत्येक मासात सामाजिक माध्यमांद्वारे संकेतस्थळ पहाणार्या जिज्ञासूंची संख्या २० सहस्र ते ३० सहस्र इतकी आहे.
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले, युरोप आणि (पू.) सौ. भावना शिंदे, अमेरिका (जानेवारी २०२१)