पुणे येथील डॉक्टर महिलेकडे ५ लाख रुपयांची खंडणी मागणार्या खंडणीखोराला अटक
पुणे – तुमच्या पतीने तुमची आणि तुमच्या मुलाच्या हत्येची ५ लाख रुपयांची मला सुपारी दिली आहे; मात्र मुलांच्या हत्येची सुपारी मी घेत नाही. मुलाला वाचवायचे असेल, तर मला ५ लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगत हत्येची धमकी देत राकेश नरेश पाटील याने खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. (अशाप्रकारे धमकी दिली जाण्यास गुन्हेगार धजावतात यावरून त्यांना कायद्याचा धाक नसल्याचे लक्षात येते. असा धाक निर्माण होण्यासाठी गुन्हेगारांना त्वरित कठोर शिक्षा होऊन त्याची कार्यवाही करणे आवश्यक आहे. – संपादक) मार्केटयार्ड पोलिसांनी या प्रकरणी खंडणीचा गुन्हा प्रविष्ट करून २४ घंट्यांच्या आत तपास करून आरोपीला पकडले.
तक्रारदार महिला या व्यवसायाने आधुनिक वैद्य असून त्यांचे बिबवेवाडी कोंढवा परिसरात चिकित्सालय आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार यांना दूरभाषद्वारे खंडणीची मागणी करणारा संशयित व्यक्ती सय्यदनगर परिसरात चालू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी काम करत आहे. त्यानुसार पोलिसांनी वेशांतर करून राकेश पाटील याला कह्यात घेतले.