खोट्या इतिहासाचे सत्य !
भारताला सहस्रो वर्षांचा इतिहास लाभला आहे. ‘अनेक देशांना केवळ भूगोल आहे, तर भारताला इतिहास आहे’, असे नेहमीच म्हटले जाते. हा इतिहास शौर्याचा, विविध शास्त्रे, औषधे आदींच्या ज्ञानाचा इतिहास आहे. या इतिहासाला जगात तोड नाही. न्यूटनच्या सिद्धांतापूर्वीच भारताला गुरुत्वाकर्षण ठाऊक होते. ‘पृथ्वी गोल आहे’, हे भारताला ठाऊक असतांना पाश्चात्त्य तिला सपाट समजत होते. विमानांचा शोध राईट बंधूंनी लावल्याचे म्हटले जात असले, तरी भारतीय शास्त्रांमध्ये विमान बांधणीची माहिती दिलेली आहे आणि त्या आधारे १९०० च्या पहिल्या दशकात शिवकर तळपदे यांनी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर विमान उड्डाणाचा प्रयत्न केला. दुर्दैवाने त्याला अपयश आले. असा भारतीय संस्कृतीच्या महानतेचा विविधांगी इतिहास भारताला लाभलेला असतांना तो पुढील पिढीला शिकवण्याऐवजी मोगलांचा, परकीय आक्रमकांचा, भारतियांच्या गुलामगिरीचा इतिहास शिकवण्याचा प्रयत्न स्वातंत्र्यापासून गेली ७४ वर्षे देशात केला जात आहे. इतकेच नव्हे, तर इंग्रजांनी भारतियांना त्यांचा वरील खरा इतिहास कधीच कळू नये, यासाठी शक्य ते प्रयत्न केले. आजही आपण त्यांचीच ‘री’ ओढत आहेत, हे भारताला आणि भारतियांना लज्जास्पद आहे. काँग्रेसच्या काळात तो पालटण्याची मागणी सध्याचा सत्ताधारी पक्ष भाजप सातत्याने करत होता. अटल बिहारी वाजपेयी यांच्याकाळात काही प्रयत्न झाले, तेव्हा विरोधी पक्षात असणार्या काँग्रेसने त्याला ‘इतिहासाचे भगवेकरण’ असल्याचे हिणवत विरोध केला आणि त्यानंतर सत्तेत आल्यावर पुन्हा त्यात पालट केला गेला. ‘गेली ७ वर्षे देशात पुन्हा भाजपचे सरकार असतांना यात अद्याप विशेष पालट झालेला नाही’, असे आता एका प्रसंगातून समोर आल्याचे दिसत आहे. एन्.सी.ई.आर्.टी.च्या १२ वीच्या इतिहासाच्या ‘थीम्स ऑफ इंडियन हिस्ट्री पार्ट-टू’ या पुस्तकात ‘मोगलांनी हिंदूंची मंदिरे पाडल्यानंतर काही ठिकाणी ती पुन्हा डागडुजी करून नीट करून दिली’, असे म्हटले होते. ‘शाहजहान आणि औरंगजेब यांनी याच्या खर्चासाठी तरतूद केली’, असे यात म्हटले आहे. याविषयी शिवांक वर्मा यांनी माहिती अधिकाराच्या अंतर्गत अर्ज करून याचे पुरावे आणि कोणत्या मंदिरांची डागडुजी करण्यात आली, यांची अधिक माहिती मागितली होती. त्याच्या उत्तरात एन्.सी.ई.आर्.टी.ने ‘याविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही’, असे थेट उत्तर दिले. याचा अर्थ ‘एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकात शिकवण्यात येणारा इतिहास हा आधारहीन आणि अयोग्य आहे, असे म्हणायचे का ? कि अशा खोट्या इतिहासाद्वारे मोगलांचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आला आहे, असे समजायचे ?’ आता हे पुस्तक गेल्या किती वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत आहे, याची माहिती समजू शकलेली नसली, तरी सध्याच्या केंद्रातील भाजप सरकारने याकडे लक्ष देऊन हा इतिहास पालटण्याची आवश्यकता होती, असे मात्र सांगावेसे वाटते.
धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था हवी !
देशातील विद्यार्थ्यांना भारताचा इतिहास शिकवणार्या एन्.सी.ई.आर्.टी.चा इतिहास आणि वर्तमान दोन्हीही हिंदुद्वेषी आहे, असेच या पुस्तकातील लिखाणावरून लक्षात येते. एन्.सी.ई.आर्.टी.ने आताच अशा प्रकारच्या चुका केल्या आहेत किंवा खोटा इतिहास शिकवण्याचा प्रयत्न केला आहे, असे नव्हे, तर यापूर्वीही तिच्याकडून असा प्रयत्न झाला आहे. त्याचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी अनेक वर्षे सतत पाठपुरावा घेत विरोध केल्यानंतर त्यात काहीसाच पालट झालेला आहे. याच एन्.सी.ई.आर्.टी.ने मोगलांच्या प्रत्येक बादशहाचे महिमामंडन केले आहे, तर भारतीय राजांचा, सम्राटांचा उल्लेखदेखील केलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख तर अवघ्या ४ ओळीत संपवण्यात आला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या ग्रंथांमध्ये प्राचीन आणि अर्वाचीन भारतातील ६ प्रमुख भारतीय सम्राटांचा आणि त्यांच्या गौरवशाली आणि शौर्यशाली इतिहासाचे लिखाण केले आहे. या सम्राटांचा साधा उल्लेखही केंद्र सरकारच्या इतिहासाच्या पुस्तकातून दिसून आलेला नाही. मोगलांना महान दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ‘अकबर द ग्रेट‘ म्हणजे ‘अकबर महान आहे’, असे या पुस्तकातून शिकवण्यात येत होते. हा भाग आता वगळण्यात आला असला, तरी ते ‘दर्या में खसखस’ असेच याला म्हणावे लागेल. अजून यात पालट करण्यासाठी मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. एन्.सी.ई.आर्.टी.सारख्या केंद्र सरकारच्या सर्व अभ्यासक्रमांतील इतिहास, भूगोल नव्यानेच लिहावा लागणार आहे. त्याला हिंदुद्वेष्ट्या राजकीय पक्षांकडून, साम्यवादी विचारसरणीच्या संघटनांकडून, इतिहासकारांकडून कितीही विरोध झाला, तरी त्याकडे दुर्लक्ष करत प्रसंगी तो मोडून काढत हा इतिहास लिहावा लागणार आहे. दुर्दैवाने तशी धडाडी सरकारमध्ये दिसून आलेली नाही. ती त्याने दाखवावी, असे हिंदूंना वाटते आहे. विद्यार्थ्यांने पराभूत इतिहास नाही, तर विजयाचा इतिहास शिकवला, तर ती भावी पिढी धडाडीची निर्माण होईल आणि पुढे भारताचे सर्व स्तरावर संरक्षण करण्यासह प्रगती पथावर जाईल. प्राचीन काळात तक्षशिला आणि नालंदा येथे असलेल्या विश्वविद्यालयांमधून विविध विषयांवर म्हणजे १४ विद्या आणि ६४ कला यांचे शिक्षण दिले जात होते. भारतात अनेक ठिकाणी गुरुकुले होती. जगभरातून विद्यार्थी येथे हे शिक्षण घेण्यासाठी येत होते; मात्र आज भारताचा खरा इतिहासही शिक्षणातून शिकवण्यात येत नाही, तेथे विदेशातून कोण कशाला भारतात शिकवण्यासाठी येईल ? ही वस्तूस्थिती आहे. यासाठी संपूर्ण शिक्षणक्षेत्रात उत्क्रांतीची आवश्यकता आहे. ती करण्यासाठी शासनकर्ते तितकेच खंबीर असण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या काळात मतपेढीच्या राजकारणामुळे अशा प्रकारची उत्क्रांती होण्याची शक्यता जवळपास नाहीच आहे, असेच म्हणावे लागेल. त्यासाठी धर्माधिष्ठित राज्यव्यवस्थेची आवश्यकता आहे. त्यामुळे शिक्षणक्षेत्रात पालट करण्यासाठी धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था आणावी लागेल. मुळात अशा राज्यव्यवस्थेमध्ये केवळ शिक्षणव्यवस्थाच नाही, तर संपूर्ण आमूलाग्र पालट करण्याची शक्ती असणार आहे. त्यात शिक्षणक्षेत्रासह अर्थ, संरक्षण, प्रशासन, न्यायपालिका, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत रामराज्याप्रमाणे स्थिती निर्माण करण्यासाठी पालट केले जातील.