‘बर्ड फ्ल्यू’चा संसर्ग आणि प्रसार होऊ नये, यासाठी सतर्कता बाळगण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

सिंधुदुर्ग ( जि.मा.का.) – राज्यातील परभणी जिल्ह्यात कोंबड्या आणि कावळे यांचा ‘बर्ड फ्ल्यूू’ च्या संसर्गाने मृत्यू झाल्याचे शासनाने घोषित केले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या रोगाचा संसर्ग आणि प्रसार होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील कुक्कुटपालक आणि नागरिक यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.

कुक्कुटपालक आणि कुक्कुटपालन क्षेत्रातील कर्मचार्‍यांनी ‘पोल्ट्री फार्म’मध्ये अचानकपणे मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांचा अनैसर्गिक मृत्यू होत असल्यास त्याची माहिती नजिकच्या पशूवैद्यकीय संस्थाप्रमुखांना द्यावी. कुक्कुटपालकांनी पोल्ट्री फार्मच्या परिसरामध्ये स्वच्छता बाळगणे, नियमित सोडियम हायपोक्लोराईड, धुण्याचा सोडा, ४ टक्के फॉरमॅलिन, चुना लावून संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करावे.