प.पू. भक्तराज महाराज यांच्या पुणे येथील भक्त डॉ. (सौ.) पूजा जोशी यांचे दीर्घ आजाराने निधन
पुणे – सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे येथील भक्त कै. दत्तात्रय जोशी यांच्या सून डॉ. (सौ.) पूजा प्रशांत जोशी (वय ५६ वर्षे) यांचे ८ जानेवारी २०२१ या दिवशी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती श्री. प्रशांत जोशी, १ विवाहित मुलगी आणि १ मुलगा, तसेच ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सासूबाई श्रीमती सविता जोशी असा परिवार आहे.
सनातन परिवार जोशी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे. लहानपणापासून वारकरी संप्रदायानुसार सेवा करणार्या कै. (सौ.) पूजा जोशी यांचे माहेर पंढरपूरपासून काही अंतरावर असलेल्या करकंब येथे आहे. त्यांना प.पू. माधवनाथ महाराज यांचा अनुग्रह प्राप्त झाला होता. त्यांनी प.पू. भक्तराज महाराज, प.पू. रामानंद महाराज, प.पू. काणे महाराज, परात्पर गुरु डॉ. आठवले, प.पू. बापू शुक्ल, पू. उत्तम बाबा, पू. परमानंद महाराज यांच्यासह इतर अनेक संतांची सेवा केली होती.
डॉ. (सौ.) पूजा जोशी यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जागी विविध देवतांचे दर्शन होणे
‘प.पू. भक्तराज महाराज यांचे पुणे येथील भक्त कै. दत्तात्रय जोशी यांच्या सून डॉ. (सौ.) पूजा जोशी यांना आध्यात्मिक त्रास होत असे. वर्ष २००१ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले हे त्यांच्या घरी गेले असता सौ. पूजा जोशी यांचा त्रास अचानक वाढला. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्यासाठी नामजपादी उपाय केले. त्या वेळी त्यांनी सौ. पूजा जोशी यांना विचारले, ‘‘समोर कोण दिसते आहे ?’’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘मला तुमच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) जागी श्री दत्तगुरु, प्रभु श्रीराम, भगवान शिव आणि अन्य देवता दिसत आहेत. सर्व देवता तुमच्यावर पुष्पवृष्टी करत आहेत.’’
– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.१.२०२१)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |