गोवा येथील सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी समष्टी साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड गुरुकृपा !

सौ. मंगला मराठे आणि त्यांचे कुटुंबीय यांनी १९९१ या वर्षी साधनेला आरंभ केला. या साधनाप्रवासात त्यांना वेळोवेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सान्निध्य आणि मार्गदर्शन यांचा लाभ झाला. ‘परात्पर गुरुदेवांच्या प्रथम भेटीतच त्यांची लागलेली ओढ, सतत सहजावस्थेत राहून स्वतःचे वेगळेपण जाणवू न देणारे परात्पर गुरुदेवांचे आगळे वेगळे व्यक्तीमत्त्व, त्यांची शिकवण्याची अनोखी पद्धत; साधक, कुटुंबीय आणि त्यांचे नातेवाईक यांचे त्रास दूर करणारे त्यांचे प्रेम, त्यांच्या प्रीतीवर्षावाची अनुभवलेली व्यापकता, साधकांचे त्रास दूर करून अन् वेळप्रसंगी स्वतः सहन करून त्यांचे सर्वार्थाने रक्षण करणार्‍या प्रेमळ गुरुमाऊलीचे वात्सल्य आणि या सगळ्यातून अनुभवलेले अध्यात्मशास्त्रातील एक महान शास्त्रज्ञाचे अष्टपैलूत्व’, असे हे परात्पर गुरुमाऊलीच्या समष्टी साधनेसाठी उपयुक्त अवतारी व्यक्तीत्वाचे सारे रेशीमधागे उलगडणारा हा साधनाप्रवास सौ. मंगला मराठे यांनी शब्दबद्ध केला आहे. आपण तो त्यांच्या शब्दांतच अनुभवण्याचा प्रयत्न करूया.

परात्पर गुरु डॉ. आठवले

१३ जानेवारी या दिवशी सौ. मंगला मराठे यांची परात्पर गुरुदेवांशी प्रथम भेट याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया. 

भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/440851.html 


(भाग २)

सौ. मंगला मराठे

३. साधनेचा आरंभ – अभ्यासवर्गाला जाणे

३ अ. दुसर्‍या दिवशी अभ्यासवर्गाला लवकर जाण्याची ओढ लागणे, सेवेविषयी काहीही ठाऊक नसतांना सेवा करावीशी वाटणे, सेवा करतांना देहभान हरपून दुपारी जेवले नसल्याचे लक्षातही न येणे आणि अभ्यासवर्गातील चैतन्यामुळे वेगळाच आनंद मिळणे : मला अध्यात्मातला ‘अ’ही कळत नव्हता, तरीही मला दुसर्‍या दिवशी अभ्यासवर्गाला लवकर जाण्याची ओढ लागली होती. ‘अभ्यासवर्गासाठी येणार्‍या लोकांना चहापान देणे, स्वागतकक्षात बसणे, अभ्यासवर्ग संपल्यावर आवरा-आवर करणे’, या सर्व कृती करतांना मला एक वेगळाच आनंद मिळत होता. असा आनंद मी कधीच अनुभवला नव्हता. मला ‘अभ्यासवर्ग संपूच नये’, असे वाटत होते. दुपारी मी स्वागतकक्षातील साधिकेला जेवण्यासाठी सोडले आणि मी तेथे बसले. नंतर परत अभ्यासवर्ग चालू झाला, तरी मी तिथेच बसले होते. ‘आज दुपारी मी जेवले नाही’, हे संध्याकाळी माझ्या लक्षात आले. अभ्यासवर्गातील चैतन्यमय वातावरणामुळे मला कशाचेही भान राहिले नव्हते.

३ आ. ‘सर्वत्रच्या जिज्ञासूंनी साधना करून स्वतःचा उद्धार करून घ्यावा’, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अनेक ठिकाणी अभ्यासवर्ग घेणे : ‘सर्वत्रच्या जिज्ञासूंना साधना कळावी आणि त्यांनी साधना करून स्वतःचा उद्धार करून घ्यावा’, अशी परात्पर गुरु डॉक्टरांनाच तळमळ होती; म्हणून ते गोव्यासमवेतच सावंतवाडी, कारवार येथे आणि इतरही पुष्कळ ठिकाणी अभ्यासवर्ग घेण्यासाठी जात असत. परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतः चारचाकी गाडी चालवत शनिवारी सावंतवाडी येथे अभ्यासवर्ग घेण्यासाठी जात होते आणि नंतर गोव्याला येत होते.

३ इ. गोव्यातील रविवारच्या अभ्यासवर्गाच्या वेळी सेवा करत असल्यामुळे वर्गात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली सूत्रे लिहून घेता न येणे, त्यासाठी सावंतवाडी येथे शनिवारी होणार्‍या अभ्यासवर्गाला जाणे : आम्ही दोघेही नोकरी करत होतो. त्या वेळी मी अधिकोषात सेवारत होते. प्रत्येक दीड मासाने अभ्यासवर्ग होत होता. रविवारी गोव्यात होणारा अभ्यासवर्ग आम्ही दोघांनी एकदाही चुकवला नाही; मात्र त्या वेळी अभ्यासवर्गाची सिद्धता करणे, ग्रंथ प्रदर्शन लावणे, स्वागतकक्ष आणि चहापान पहाणे, अशी सेवा करणार्‍या साधकांचा अभ्यासवर्ग चुकत असे. त्यामुळे आम्हाला गोव्यातील अभ्यासवर्गात सांगितलेली सूत्रे लिहून घेण्यास जमत नव्हते. यावर उपाय म्हणून काही मासांनी मी आणि यजमान दुचाकीवरून शनिवारी सावंतवाडीला होणार्‍या अभ्यासवर्गाला जाऊ लागलो होतो. आम्हाला सावंतवाडीला पूर्ण अभ्यासवर्ग ऐकायला मिळत असल्यामुळे गोव्यातील अभ्यासवर्गाच्या वेळी सेवा करता येत होती.

३ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अभ्यासवर्गात येणार्‍या जिज्ञासूंचे गुण हेरून त्यांच्या चांगल्या कृतींचे कौतुक करून इतरांनाही त्यासाठी प्रोत्साहित करणे : गोवा येथे अभ्यासवर्गाला येणारे जिज्ञासू पुष्कळ होते; पण सेवा करणारे अल्प होते. यासाठी परात्पर गुरु डॉक्टर आठवले पहिल्या अभ्यासवर्गापासूनच प्रत्येक जिज्ञासूतील चांगले गुण हेरून आणि त्यांच्या चांगल्या कृतींचे कौतुक करून त्यांना साधना अन् सेवा करण्यासाठी प्रोत्साहन देत होते. त्यातून ते अन्य जिज्ञासूंनाही तशी कृती करण्यास उद्युक्त करत असत.

१. आमच्या पहिल्याच अभ्यासवर्गात परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हा दोघांना उभे करून आमचे कौतुक केले आणि ‘सेवा करतांना काय जाणवले ?’, हे इतरांना सांगण्यास सांगितले. त्यातून त्यांनी ‘एकमेकांकडून कसे शिकायचे ?’, हे आम्हाला शिकवले.

२. आम्ही सावंतवाडी येथे अभ्यासवर्ग ऐकायला जात होतो आणि गोव्यात अभ्यासवर्गाच्या वेळी सेवा करत होतो. आमची ही कल्पना परात्पर गुरु डॉक्टरांना पुष्कळ आवडली आणि त्यांनी अभ्यासवर्गात आमचे कौतुक करून आम्हाला साधना अन् सेवा करण्यासाठी पुष्कळ प्रोत्साहन दिले. त्यामुळे आमची सेवा आणि साधना दोन्ही साध्य करण्याची तळमळ वाढली.

३ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रेमळ सान्निध्यात पुष्कळ आनंद मिळत असल्यामुळे त्यांची पुष्कळ आतुरतेने वाट पहाणे आणि अभ्यासवर्ग संपवून ते जातांना पुष्कळ वाईट वाटणे : परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रेमाने आम्हाला एवढे आपलेसे केले होते की, दीड मास आम्ही त्यांची चातकाप्रमाणे आतुरतेने वाट पहात असायचो. आम्हाला त्यांच्या प्रेमळ सान्निध्यात पुष्कळ आनंद मिळत असे. आम्ही प्रत्येक अभ्यासवर्गासाठी ४ दिवस सुट्टी घेऊन त्यांच्या सत्संगात रहात होतो. चार दिवसांनंतर ते गोवा सोडून मुंबईला जायला निघाले की, मला गणपति विसर्जनाच्या वेळी जसे वाईट वाटते, तसे पुष्कळ वाईट वाटायचे. पुढील २ -३ दिवस माझे मन उदास असायचे आणि चाकरी किंवा व्यवहार या कशातच रस वाटायचा नाही.

४. पत्रलेखनातून शिकवलेले वेळेचे महत्त्व !

४ अ. साधनेविषयी काही शंका किंवा आलेल्या अनुभूती परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पत्राद्वारे विचारणे आणि त्यांनी त्याचे त्वरित उत्तर देणे : प्रत्येक अभ्यासवर्गात परात्पर गुरु डॉक्टर आम्हाला साधनेविषयी मार्गदर्शन करत होते; परंतु त्याविषयी आमच्या मनात काही शंका राहिल्या असतील किंवा आम्हाला कुणाला काही अनुभूती आली असेल, तर आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांना ती पत्राने लिहून कळवत होतो. त्या वेळी दूरभाष किंवा भ्रमणभाष यांची सुविधा नव्हती, तरीही आम्हाला त्या पत्राचे त्वरित म्हणजे तिसर्‍याच दिवशी (आठवड्याच्या आत) उत्तर मिळत होते. त्या पत्रात शंकानिरसनासमवेत साधनेसाठी प्रोत्साहनपर शब्दही असायचे. त्यात गोव्यातील साधकांची विचारपूस केलेली असायची, प्रसाराविषयी काही सूचना सांगितलेल्या असायच्या आणि मुंबई येथील प्रसारातील काही सूत्रेही सांगितलेली असायची.

४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांच्या वेळेचा विचार करून ‘पत्रात अधोरेखित केलेली सूत्रे महत्त्वाची असून अन्य सूत्रे वेळ असल्यास वाचावी’, असे लिहिणे, त्या वेळी त्यांच्याकडून इतरांचा विचार करणे आणि वेळेचा योग्य उपयोग करणे, ही सूत्रे शिकण्यास मिळणे : वर्ष १९९१ ते वर्ष १९९५ या कालावधीत आम्ही १५ ते २० साधक आपापली चाकरी सांभाळून अध्यात्मप्रसाराची सेवा करत होतो. आम्ही क्रियाशील झालो होतो. परात्पर गुरु डॉक्टर आम्हा सर्वांच्या वेळांचा विचार करून ‘पत्रात अधोरेखित केलेली सूत्रे महत्त्वाची असून अन्य सूत्रे वेळ असल्यास वाचावीत’, असे लिहून कळवायचे. खरेतर परात्पर गुरु डॉक्टर स्वतःही पूर्ण व्यस्त असायचे, तरीही ते तत्परतेने आमच्या पत्रांना उत्तरे देत होते. त्यातून ‘इतरांचा विचार करणे आणि वेळेचा योग्य उपयोग करणे’, हे गुण आम्हाला शिकायला मिळाले.

– सौ. मंगला मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.४.२०१७)

  (क्रमश: उद्याच्या अंकात) 

भाग ३. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/441505.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक