५९ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील कु. पार्थ सुनील घनवट (वय १३ वर्षे)

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. पार्थ सुनील घनवट एक आहे !

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. पार्थ घनवट

(‘ऑक्टोबर २०२० मध्ये कु. पार्थ याची आध्यात्मिक पातळी ५९ टक्के होती.’ – संकलक)

१. उत्तम वक्तृत्व

श्री. सुनील घनवट

‘कु. पार्थ तिसरीत असल्यापासून शाळेतील कार्यक्रमात होणार्‍या भाषणाच्या कार्यक्रमांत उत्स्फूर्तपणे भाग घेतो. त्यात त्याला पारितोषिकही मिळते.

२. त्याला पोवाडे मुखोद्गत असून तो ते चांगल्या प्रकारे म्हणतो.

३. सेवेची तळमळ

दळणवळण बंदीच्या काळात सेवा करता येत नव्हती. त्यामुळे तो जिल्ह्यातील विष्णुलीला सत्संगात अधूनमधून सहभाग घेत असे. गणेशोत्सवात अधिकाधिक ठिकाणी प्रवचने घेण्याचे नियोजन केल्याचे त्याला समजल्यावर तो याविषयी त्याच्या शाळेतील मित्रांशी बोलला. पार्थची आई आणि आमच्या गावाकडील सर्वांशी भ्रमणभाषवर बोलून ‘एफ्.सी.सी. कसे डाऊनलोड करायचे ?’, हे त्याने शिकवले. प्रवचनाच्या वेळा उत्तरदायी साधकांशी बोलून ठरवल्या आणि सर्वांना आठवण करून दिली. प्रवचन झाल्यावर आढावा देण्यासह सर्व कृती तो स्वतः पुढाकार घेऊन करत होता.

सण आणि उत्सव यांवेळी तो पहाटे लवकर उठून आईच्या समवेत सेवेसाठी जातो. ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे वितरण करून तो त्याविषयी लोकांचे शंकानिरसन करतो.

४. एकाग्रतेने, परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करणे

‘दळणवळण बंदीच्या काळात पुणे येथून काही ‘ऑनलाईन’ कार्यक्रमांमध्ये माझ्याकडे वक्ता म्हणून बोलण्याची सेवा होती. त्या वेळी कु. पार्थ ‘त्याची पूर्वसिद्धता करणे, ध्वनीचित्रीकरण करणे, समन्वयासाठी भ्रमणभाषवर जोडणी करणे, कार्यक्रम चालू असतांना बारकावे सांगणे’, असे करत होता. तो वयाने लहान असूनही सर्व सूत्रे व्यवस्थित ऐकून चांगला समन्वय साधत होता. तो सेवा एकाग्रतेने, भावपूर्ण आणि परिपूर्ण करत होता.

साधकांनी त्याला सेवेविषयी विचारल्यावर तो सांगत असे, ‘‘श्रीकृष्णच करवून घेत आहे.’’ त्याचा भाव पाहून साधकांना त्याचे कौतुक वाटायचे.

५. शिकण्याची वृत्ती

पार्थची आकलनक्षमता पुष्कळ चांगली असल्याने त्याला सांगितलेले सूत्र लगेच लक्षात येते. तो प्रत्येक सूत्र जिज्ञासेने विचारतो. त्याने ‘सोशल मिडिया’ची सेवा व्यवस्थित शिकून घेतली. त्याने फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप यांवर प्रतिदिन ‘लाईव्ह’ कार्यक्रमाचे संदेश पाठवण्याची सेवा केली. त्याचे साहाय्य मिळाल्यामुळे मला अन्य सेवांना वेळ देता आला.

६. समाधानी

‘मी आणि माझी पत्नी पूर्णवेळ साधना करत आहोत’, हे त्याला ठाऊक आहे. त्यामुळे तो इतरांशी तुलना न करता देवाने जे दिले आहे, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. ‘आश्रमात देव आपल्याला सर्व देत आहे’, असा त्याचा विचार असतो. कधी कधी खरेदीसाठी गेल्यावर ‘अधिक किंमतीच्या वस्तू, कपडे किंवा खाऊ घेणे परम पूज्यांना आवडणार नाही’, असे तो सांगतो. आवड-निवड न ठेवता ‘साधेच कपडे घेतले, तरी चालतील’, असे तो म्हणतो. तो समाधानी असतो. यातून ‘लहान वयातच देवाने साधक कसे घडवले आहेत ?’, याविषयी कृतज्ञता वाटते.

७. दळणवळण बंदीच्या काळात व्यष्टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करणे

दळणवळण बंदीच्या काळातील ६ मासांत त्याने व्यष्टी साधना मनापासून केली, उदा. दुर्गा, शिव आणि दत्त यांचा नामजप नियमित करणे, स्वयंसूचना सत्रे करणे, सारणी लिखाण करणे, चुका सांगणे अन् क्षमायाचना करणे. सकाळी आम्ही सर्व जण आदल्या दिवशी झालेल्या चुकांविषयी एकमेकांची क्षमायाचना करत असतांना तोही क्षमायाचना करतो. त्याच्याकडून व्यष्टी साधनेचा एखादा प्रयत्न झाला नाही, तर तो व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगतो. आढावा देत असतांना ‘त्याचे बोलणे ऐकत रहावे’, असे वाटते. तो मनमोकळेपणाने, प्रामाणिकपणे आणि प्रांजळपणे व्यष्टी साधनेचा आढावा देतो, तसेच गांभीर्याने प्रायश्‍चित्त घेतो.

८. कोरोना महामारीविषयीच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे

तो कोरोना महामारीविषयीच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करत होता. तो ६ मासांत एकदाही दरवाजाच्या बाहेर गेला नाही. ‘आपण सर्व सूचनांचे पालन केले, तर देव रक्षण करणार आहे’, अशी त्याची अढळ श्रद्धा होती. आजूबाजूच्या परिसरात कोरोना महामारीचा संसर्ग पुष्कळ वाढला होता, तरी आम्हाला काहीही त्रास झाला नाही.

९. परिस्थितीशी जुळवून घेणे

दळणवळण बंदीच्या काळात आमच्या सेवेमुळे त्याच्याकडे लक्ष दिले जात नव्हते. त्याविषयी त्याची काहीही तक्रार नसते. तो पुष्कळ सहजतेने जुळवून घेतो. तो स्वतःहून स्वतःचा अभ्यास, सेवा आणि व्यष्टी साधना करत असे.

१०. तो श्रीकृष्णाशी बोलत असतो. ‘त्याची आंतरिक साधना चालू आहे’, असे वाटते. ‘तो बर्‍याचदा अनुसंधानात आहे’, असे जाणवते.

११. आईला आध्यात्मिक त्रास होत असतांना नामजपादी उपाय सांगणे

पार्थ आणि सौ. अर्चना (पार्थची आई) पुण्यातील सेवाकेंद्रात रहात होते. मी सेवेनिमित्त बाहेरगावी असतो. अर्चनाला आध्यात्मिक त्रास आहे. तो स्वतःहून उदबत्ती, कापूर, अत्तर, गोमूत्र यांचे उपाय करतो. जेव्हा अधिक तीव्र त्रास असेल, तेव्हा तो लगेच संबंधितांना भ्रमणभाष करून नामजपादी उपाय विचारून घेत असे. उपाय केल्यावर २० ते २५ मिनिटांनंतर आईला बरेही वाटते. तो असे कठीण प्रसंग शांतपणे हाताळतो. आईला बरे वाटायला लागल्यावर तो त्याविषयी आढावा देतो.

१२. समजूतदारपणा आणि निरपेक्षता

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी पार्थच्या आईकडे प्रसाराची सेवा असल्यामुळे सभेच्या सेवांसाठी असलेल्या निवासस्थानी तोही सेवेसाठी जातो. त्या वेळी ‘साधकांच्या लहान मुलांशी खेळणे आणि त्यांना सांभाळणे’ या गोष्टी तो पुष्कळ प्रेमाने करतो. त्याची लहान मुलांशी लगेच जवळीक होते. त्याच्या ‘आम्ही वेळ द्यावा, त्याच्या जेवणाचे पहावे किंवा त्याच्या समवेत असावे’, अशा कोणत्याही अपेक्षा नसतात. आम्हाला रात्री घरी येण्यास विलंब झाला, तरी त्याची कोणतीही तक्रार नसते.

१३. ‘आपत्काळाच्या दृष्टीने सर्व शिकून घ्यायला हवे’, असा भाव ठेवून स्वयंपाकघरातील सेवा शिकणे

लहानपणापासूनच पार्थ सेवाकेंद्रात असल्यामुळे तेथील कार्यपद्धतींचे तो पालन करतो. तो सेवाकेंद्रात स्वयंपूर्ण होण्यास शिकला आहे. आताच्या दळणवळण बंदीच्या काळात त्याने सेवाकेंद्रात ‘चहा बनवणे, भाजीला फोडणी देणे, वरण-भाताचा कूकर लावणे, भाजी चिरणे’ इत्यादी सेवा शिकून घेतल्या आहेत. एरव्ही आईला त्रास होत असेल, तर तो स्वयंपाकाची सेवा पुढाकार घेऊन करतो. गुरुदेवांनी सांगितल्यानुसार ‘आपत्कालाच्या दृष्टीने आपण सर्व शिकून घ्यायला हवे’, असा त्याचा भाव असतो.

१४. भाव

१४ अ. बर्‍याचदा नामजप करतांना ‘मी श्रीकृष्णाशी बोलत आहे’, असे सांगत असतांना त्याची भावजागृती होते. ‘गुरुदेव आणि श्रीकृष्ण एकच आहेत’, असा त्याचा भाव असतो.

१४ आ. संतांविषयीचा भाव

१४ आ १. सद्गुरु (कु.) स्वाती खाडये : सद्गुरु (कु.) स्वातीताई (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये) यांच्याप्रती त्याचा आरंभीपासून पुष्कळ भाव आहे. सद्गुरु ताईंनी एखादे सूत्र सांगितले की, ‘काय करू आणि कसे करू ?’, अशी त्याची स्थिती असते. तो त्यांचे आज्ञापालन लगेचच करतो. त्याला सद्गुरु ताईंविषयी पुष्कळ अनुभूती येतात आणि त्यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवते. ‘त्या सूक्ष्मातून समवेत आहेत’, अशी अनुभूती त्याला येते. तो सर्व गोष्टी सद्गुरु ताईंना सांगतो. सद्गुरु ताई त्याला पुढचे प्रयत्न सांगतात. तेव्हा तो ते लगेचच कृतीत आणतो.

१४ आ २. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : त्याला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना भेटण्याची संधी २ – ३ वेळा मिळाली. त्या वेळी तो त्यांच्याकडे पहात असतांना निर्विचार होऊन अंतर्मुख झाल्याचे लक्षात आले. त्याला ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याकडून चैतन्य मिळाले’, असे जाणवले.

१५. स्वभावदोष

ऐकण्याची वृत्ती नसणे आणि मनाप्रमाणे करणे.

‘भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. गुरुमाऊलीच्या कृपेने असे दैवी बालक आमच्या पोटी जन्माला आले आणि त्या माध्यमातून हिंदु राष्ट्रासाठी भावी पिढीच घडत आहे’, याविषयी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. सुनील घनवट (चि. पार्थचे वडील), पुणे (२६.११.२०२०)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक