स्वतंत्र ग्रामपंचायत मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील १२ गावांचा निवडणुकीवर बहिष्कार !
एकही उमेदवारी अर्ज नाही
गोंदिया – जिल्ह्यात १५ जानेवारी या दिवशी १८९ ग्रामपंचातीसाठी मतदान होत आहे. अशातच ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेवटची ग्रामपंचायत आणि नक्षलग्रस्त भागात असलेल्या भरनोली गट ग्रामपंचायत अंतर्गत येणार्या १२ गावांतील नागरिकांनी भरनोली गट ग्रामपंचायतीचे विभाजन करून स्वतंत्र राजोली ग्रामपंचायतची निर्मिती करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे १५ जानेवारीला होणार्या निवडणुकीत भरनोली ग्रामपंचायतीसाठी एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरलेला नाही. त्यामुळे या संदर्भात जिल्हा प्रशासन नेमकी काय भूमिका घेते याकडे तालुकावासियांचे लक्ष लागले आहे.
(१२ गावांतील गावकर्यांनी वारंवार मागणी करूनही स्वतंत्र ग्रामपंचायत सिद्ध न करणे हे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना लज्जास्पद आहे. या दोघांनी गावकर्यांची मागणी का पूर्ण केली नाही ? ग्रामपंचायत नसल्याने गावकर्यांना कामांमध्ये त्रास होतो, याची नोंद प्रशासनाने का घेतली नाही ? – संपादक)
गावकरी वरील मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत; पण त्याची अद्यापही नोंद घेण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकत भरनोली, तिरखुरी, राजोली १, राजोली २, खडीक १, खडकी २, सायगाव, तुकूम, नवीनटोला, शिवरामटोला, बलीटोला, बोरटोला या गावांतील मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत आगामी येणार्या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय गावकर्यांनी घेतला आहे.