अग्नीशामक तपासणीच्या (फायर ऑडिट) प्रतिक्षेत जिल्हा शासकीय रुग्णालय !
सातारा, १२ जानेवारी (वार्ता.) – भंडारा येथील घटनेनंतर राज्यातील सर्वच रुग्णालयांच्या अग्नीशामक तपासणींचे (फायर ऑडिटचे) सूत्र ऐरणीवर आले आहे; मात्र गत एक तप सातारा जिल्हा रुग्णालयाची अग्नीशामक तपासणी (फायर ऑडिट) झाले नसल्याची गोष्ट समोर आली आहे. यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय अग्नीशामक तपासणीच्या (फायर ऑडिट) प्रतिक्षेत असल्याची माहिती आहे.
भंडारा जिल्ह्यात नवजात बालकांच्या दक्षता विभागाला आग लागून १० बालकांचा दुर्देवी अंत झाला. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकार्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील नवजात बालकांच्या दक्षता विभागाची पहाणी केली. तसेच विभागामध्ये काही दुर्घटना घडली, तर नवजात बालकांनी तात्काळ रुग्णालयाबाहेर कसे काढायचे, अग्नीसुरक्षा यंत्रणा कशी हाताळायची, याचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, जिल्हा शासकीय रुग्णालयाची अग्नीशामक तपासणी झालेली नाही. संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांनाही तपासणीचे प्रशिक्षण नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे तात्काळ खासगी संस्थेशी संपर्क साधून जिल्हा शासकीय रुग्णालयासह कराड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या अग्नीशामक तपासण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.