पवई (मुंबई) येथे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पोलिसाला मारहाण
आमदार राम कदम यांनी आरोपींना सोडण्याची विनंती केल्यामुळे टीका
मुंबई – पवई येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पोलीस हवालदार नितीन खैरमोडे यांना शिवीगाळ करून पुष्कळ मारहाण केली. सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभर अशी आरोपींची नावे आहेत. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यांतील सचिन तिवारी यांना पोलिसांनी अटक केली असून अन्य दोघांनी पलायन केले आहे. पोलिसांना मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडलेला असतांना भाजपचे आमदार राम कदम यांनी मात्र या प्रकरणी मारहाण झालेले पोलीस नितीन खैरमोडे यांना दूरभाष करून ‘माणुसकी दाखवून आरोपींना सोडून द्या’, अशी विनंती केली आहे. राम कदम यांचा हा ऑडिओ सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्यात आला असून या प्रकरणी अन्य राजकीय पक्षांचे नेते आणि समाजातून टीका करण्यात येत आहे.
पवई येथील हिरानंदानी येथील ‘गॅलरिया मॉल’जवळ एका आधुनिक वैद्य असलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गाडीला कार्यकर्त्यांच्या गाडीची धडक लागली. धडक देणारे तिघे जण दुचाकीवर एकत्र बसले होते. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी पोलीस हवालदार नितीन खैरमोडे आरोपींना रिक्शातून पोलीस ठाण्यात नेत असतांना त्यांनी खैरमोडे यांना मारहाण केली. पोलीस खैरमोडे यांनी आरोपींनी आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचेही म्हटले आहे; मात्र आमदार राम कदम यांनी ‘आरोपींचे भवितव्य उद्ध्वस्त होईल. त्यामुळे माणुसकी दाखवून त्यांना सोडून द्यावे’, यांनी असे म्हटले. बहिणीवरून शिवीगाळ केली असल्यामुळे खैरमोडे यांनी आरोपींना क्षमा करण्यास स्पष्ट नकार दिला.