कोल्हापुरात पोलिसांना पुढील काळात १५ दिवसांची सक्तीची रजा !
कोल्हापूर – सातत्याने कामाच्या ताणामुळे पोलीस कर्मचार्यांच्या कामगिरीवर परिणाम होत आहे. त्यातून ते ना कुटुंबाला ना कर्तव्यावर लक्ष देऊ शकतात. त्यामुळे वर्षभरात सर्व पोलीस कर्मचार्यांना १५ दिवसांची सक्तीची रजा दिली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. पोलीस ठाण्याच्या प्रभारींना रजेची दिनदर्शिका बनवण्याची सूचना त्यांनी केली आहे.
याविषयी पोलीस अधीक्षक बलकवडे म्हणाले, ‘‘२ दिवसांपूर्वी निवृत्त पोलीस कर्मचार्यांचा कल्याण निधीचा कार्यक्रम झाला. यात मी निवृत्त कर्मचार्यांना ‘प्रवासी सुट्टी (एल्.टी.ए.) किंवा अर्जित १५ दिवसांची कधी सेवा काळात सुट्टी घेतली आहे का ?’, अशी विचारणा केली. तेव्हा निवृत्त कर्मचार्यांकडून ‘नाही’, असे उत्तर आले. कर्तव्य बजावतांना अनेक प्रश्नांना पोलीस कर्मचार्यांना सामोरे जावे लागते. कामाच्या सततच्या ताणामुळे मानसिक स्थिती तणावग्रस्त असते. त्याचा परिणाम नियमित कामकाजावर होत आहे. त्यात कुटुंबाला पुरेसा वेळ देता येत नाही. घरातील विवाह, पाल्यांच्या १०, १२ वीच्या परीक्षांना वेळ देता यावा, याकरीता वर्षातील १५ दिवस अशी रजा सक्तीने कर्मचार्यास घ्यावी लागणार आहे.’’