पाक आणि चीन यांचे एकत्र येणे भारतासाठी धोकादायक असले, तरी दोन्ही आघाड्यांवर आम्ही सिद्ध ! – सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे
नवी देहली – पाकिस्तान आणि चीन यांचे एकत्र येणे भारतासाठी धोकादायक आहे. पाककडून आतंकवादाला प्रोत्साहन दिले जाते; मात्र आम्ही आतंकवाद कदापि सहन करणार नाही. ही आमची भूमिका आहे. आतंकवादी कारवायांना प्रत्युत्तर देण्यात येईल. ‘त्यासाठीची वेळ आणि ठिकाण आम्ही निश्चित करतो’, हा संदेश आपल्याकडून सीमेपलीकडील देशाला देण्यात आला आहे, अशी चेतावणी सैन्यदलप्रमुख मनोज नरवणे यांनी दिली आहे. ते वार्षिक पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलत होते. ‘सैन्य आणि बिगरसैन्य क्षेत्रांमध्ये चीन आणि पाक यांचे सहकार्य वाढत आहे. त्यामुळे २ आघाड्यांवर आव्हानांचा सामना करण्याची सिद्धता आपल्याला ठेवायला हवी,’ असेही जनरल नरवणे म्हणाले.
सौजन्य : ABP NEWS
सैन्यदलप्रमुख नरवणे यांनी मांडलेली सूत्रे
१. आम्ही याआधीही आव्हानांचा सामना करून मार्गक्रमण केले आहे. भारतीय सैन्याने लडाखमध्येच नव्हे, तर प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील गस्ती वाढवल्या आहेत. भारत आणि चीन यांमध्ये कमांडर स्तरावरील ८ बैठका झाल्या आहेत. आता लवकरच ९ वी बैठक होईल.
२. सीमेवर शांतता नांदावी, अशीच आमची अपेक्षा आहे; पण सीमेवर कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आम्ही दोन हात करण्यास पूर्णपणे सिद्ध आहोत.
३. भविष्यातील आव्हानांचा विचार करता सैन्याला अधिकाधिक सुसज्ज करण्यात येईल. यासाठी तंत्रज्ञानाचे साहाय्य घेण्यात येईल.