नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधीपूर्वी अमेरिकेत सशस्त्र आंदोलनाची शक्यता ! – एफ्.बी.आय.ची चेतावणी
जगातील सर्वांत जुन्या समजल्या जाणार्या लोकशाही देशातील ही स्थिती भयावह आहे. यातून अन्य लोकशाहीप्रधान देशांनी बोध घेऊन सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे !
वॉशिंग्टन (अमेरिका) – येथील संसदेच्या इमारतीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आता नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधीच्या पूर्वी, म्हणजे १६ जानेवारी ते २० जानेवारी या कार्यकाळात मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांकडून वॉशिंग्टन डीसी आणि अन्य ५० राज्यांमध्ये सशस्त्र आंदोलन केले जाण्याची शक्यता आहे, अशी चेतावणी अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणा एफ्.बी.आय.ने दिली आहे. बायडेन यांचा शपथविधी झाल्यानंतर पुढील ३ दिवसांसाठीही ही चेतावणी कायम असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. वॉशिंग्टनला सुरक्षेसाठी जवळपास १५ सहस्र सैनिक तैनात केले जाणार आहेत. याखेरीज वॉशिंग्टन स्मारकाला भेट देण्यासाठी पर्यटकांच्या येण्यावर २४ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची शक्यता
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर संसदेवरील हिंसाचारास प्रोत्साहन दिल्यावरून महाभियोग चालवण्यासाठी कायदा संमत करण्याच्या दिशेने प्रयत्न चालू आहेत, असे अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांनी म्हटले आहे.