आय.आय.टी. प्रकल्प रहित करण्यासाठी शेळ-मेळावली येथील आंदोलकांकडून शासनाला १० दिवसांची मुदत
परिसरातील गावांचा मेळावलीवासियांना पाठिंबा
वाळपई, ११ जानेवारी (वार्ता.) – शेळ-मेळावली येथील नियोजित आय.आय.टी. प्रकल्प रहित करण्यासाठी येथील आंदोलकांकडून शासनाला १० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. येथे चालू असलेल्या मेळावली पंचक्रोशी ग्राम बचाव आंदोलनातील लोकांनी महिला आंदोलकांचा अवमान करणारे पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर यांच्यावर शासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. १० जानेवारीला म्हावशी, धामसे, खोतोडे अणि इतर जवळपासच्या गावांतून मोठ्या संख्येने लोक मेळावली येथे उपस्थित होते. सत्तरीतील भूमीसंबंधीचा प्रश्न सोडवून या ग्रामस्थांच्या पूर्वजांपासूनची लागवडीखालील भूमी शासनाने लागवड करणार्यांच्या नावाने करावी, अशी या आंदोलकांची मागणी आहे.
दुसरीकडे या प्रकरणी आंदोलकांनी शासनाशी चर्चा करावी, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, ‘‘आम्ही चर्चा करण्यास सिद्ध आहोत. आम्ही ‘नाही’ असे कधी म्हटले का ? मेळावली येथील लोकांनी चर्चेला पुढे यावे, हे मी पहिल्यापासून सांगत आहे. मी त्यांना चर्चेसाठी बोलावले आहे.’’ तुम्ही मेळावली येथे लोकांना भेटायला जाणार का ? या प्रश्नावर ‘मी आधी एकदा गेलो आहे’, असे त्यांनी उत्तर दिले.
शेळ-मेळावली येथील आंदोलकांना म्हावशी गावातील लोकांचा पाठिंबा
शेळ-मेळावली येथील ग्रामस्थांना म्हावशी गावातील ३०० ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. या ग्रामस्थांकडून ११ जानेवारीला वाळपई येथे मोर्चा काढण्यात आला. पोलिसांनी हा मोर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला, तरीही आंदोलकांनी मोर्चा चालू ठेवला.
आय.आय.टी. प्रकल्पाविषयीच्या परिस्थितीचा अभ्यास करून मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार ! – विश्वजित राणे
पणजी शेळ-मेळावली येथील आय.आय.टी. प्रकल्पाविरुद्धच्या आंदोलनाने उग्र रूप धारण केल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री आणि स्थानिक आमदार विश्वजित राणे यांनी ‘गावातील परिस्थितीचा अभ्यास करून मी मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार’ असे ट्वीट केले आहे. ट्वीटमध्ये ते म्हणाले, ‘‘शेळ-मेळावली येथील लोकांना भेटून मी तेथील आय.आय.टी. प्रकल्पासंबंधी अभ्यास करीन आणि नंतर त्याविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करीन.’’
शैलेंद्र वेलिंगकर आणि विश्वेश प्रभू यांची जामिनावर मुक्तता
पणजी शेळ-मेळावली येथील आय.आय.टी. प्रकल्पाच्या विरोधात आंदोलकांना पाठिंबा देणारे श्री. शैलेंद्र वेलिंगकर आणि विश्वेश प्रभू यांना ७ जानेवारी या दिवशी अटक करण्यात आली होती. त्यांची स्थानिक न्यायालयाकडून ११ जानेवारीला जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. याशिवाय खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या १७ जणांच्या जामीन अर्जांवर १२ जानेवारीला सुनावणी होणार आहे. शैलेंद्र वेलिंगकर यांना पोलीस कोठडीत मारहाण करण्यात आल्याचा आरोप त्यांचे वडील प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केला होता.
शैलेंद्र वेलिंगकर मारहाण प्रकरणी निष्पक्ष चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी
पणजी – राज्यात भाजप शासनाकडून मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. शैलेंद्र वेलिंगकर यांना पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणी निष्पक्षपणे उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यासंबंधी पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘‘लोकांना पोलिसांकडून मारहाण करून भाजप शासन मानवी हक्कांचे उल्लंघन करत आहे. लोकांना अटक करून त्यांना पोलीस कोठडीत मारहाण करण्याचा पोलिसांना अधिकार आहे का ? शैलेंद्र वेलिंगकर यांना मारहाण करण्याची अनुमती पोलिसांना कुणी दिली ? सर्व जनता भाजपला लक्ष्य करत असल्याने भाजपला निराशा आली आहे. पोलीस ज्या पद्धतीने शेळ-मेळावली येथील आंदोलन हाताळत आहेत, त्यामुळे गोव्यातील जनतेमध्ये खळबळ माजली आहे. पोलिसांनी शैलेंद्र वेलिंगकर यांना केलेल्या मारहाणीचा निषेध करतो. या मारहाणीनंतर शैलेंद्र वेलिंगकर यांना ऐकू येत नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या समितीने शैलेंद्र वेलिंगकर यांची आरोग्यतपासणी करावी.’’