‘बैलांच्या ‘धिरयो’ला मान्यता द्यावी’, अशी पेडणे येथील काही बैलांच्या मालकांची शासनाकडे मागणी
शासनाकडून ‘धिरयो’ वर बंदी असूनही पेडणे तालुक्यात अवैधरित्या ‘धिरयो’ चे आयोजन
पेडणे, ११ जानेवारी (वार्ता.) – पेडणे भागातील मांद्रे, हरमल, केपे, कोरगाव, मोरजी आणि तुये या गावांमध्ये राजकारण्यांच्या पाठिंब्याने पोलिसांना न जुमानता अधूनमधून ‘धिरयो’चे (बैल किंवा रेडे यांच्या झुंजी) आयोजन करण्यात येते. पेडणे येथील पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांच्यासमोर हे एक मोठे आव्हान आहे. त्यांची नियुक्ती झाल्यानंतर २ दिवसांत केरी, मोरजी, मांद्रे, हरमल आणि कोरगाव या गावांत ‘धिरयो’ चे आयोजन करण्यात आले होते . याविषयीची बातमी पोलिसांना मिळताच त्यांनी मोरजी येथे होणारे धिरयोचे आयोजन बंद पाडण्यासाठी सकाळी ५ वाजल्यापासून तेथे पोलीस बंदोबस्त ठेवला. यामुळे तेथील ‘धिरयो’ कार्यक्रम रहित झाला. त्यानंतर पुन्हा मांद्रे आणि मोरजी येथे ‘धिरयो’ घेण्यात आल्या. या बैलांच्या झुंजींमध्ये काही वेळा एखाद्या बैलाचा मृत्यू होतो आणि मग समाजात याविषयी चर्चा होते. या झुंजीमध्ये माणसांना काही झाले, तर उत्तरदायी कोण ? असा प्रश्न येथील सर्वसामान्य जनता विचारत आहे. दुसरीकडे या ‘धिरयो’ साठी काही जणांनी १० ते १२ बैल पोसले आहेत. या बैलांच्या झुंजीवर लाखो रुपयांची पैज लावली जाते. या झुंजींकडे मनोरंजनाचा खेळ म्हणून पहावे, असे आयोजकांचे म्हणणे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ५ वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार विष्णु वाघ यांनी ‘धिरयो’ ला मान्यता देण्यात यावी’, अशी मागणी केली होती. ‘शासनाने या बैलांच्या झुंजींना मान्यता द्यावी’, अशी या बैलांच्या मालकांची मागणी आहे. इतर सर्व अवैध व्यवसाय चालू आहेत, तर बैलांचा झुंजीवर बंदी का ?’, असा प्रश्न हे धिरयोचे आयोजक विचारत आहेत. (‘इतर अवैध व्यवसाय करतात; म्हणून आम्हालाही अवैध व्यवसाय करायला द्या’, ही घातक प्रवृत्ती नष्ट करायला हवी ! समाजाची मानसिकता धर्मशिक्षणाअभावी किती हीन झाली आहे, ते यातून लक्षात येते. सर्वच जण अवैध व्यवसाय करायला लागले, तर पृथ्वीवर गुंडांचेच राज्य येईल. आताच कायद्याचा धाक असूनही अनेक अवैध व्यवसाय राजकारणी, प्रशासकीय अधिकारी, गुंड, धनाढ्य यांच्या पाठिंब्याने चालतात. – संपादक)