गोव्यातील ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारताची बांगलादेशसमवेत अधिक प्रमाणात सांस्कृतिक देवाणघेवाण
पणजी, ११ जानेवारी (वार्ता.) – गोव्यात १६ जानेवारी ते २४ जानेवारी २०२१ या कालावधीत होणार्या ५१ व्या आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या वेळी बांगलादेश या देशावर अधिक प्रमाणात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. भारत आणि बांगलादेश या २ देशांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी, हा या मागचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. (बांगलादेशसमवेत सांस्कृतिक देवाणघेवाण करतांना तेथील मूलनिवासी हिंदूंना धार्मिक स्वातंत्र्य देणे आणि केवळ हिंदु म्हणून त्यांच्यावर होणारे अत्याचार रोखणे शक्य व्हावे, ही अपेक्षा ! – संपादक)
डेन्मार्क येथील चित्रपट निर्माते थॉमस व्हिंटरबर्ग यांच्या ‘अनादर राऊंड’ या चित्रपटाच्या ‘प्रिमियर शो’ने या महोत्सवाचा प्रारंभ होईल आणि कियोशी कुरोसावा यांच्या ‘वाईफ ऑफ अ स्पाय’ या ऐतिहासिक चित्रपटाने या महोत्सवाची सांगता होईल. या महोत्सवात ‘मेरूनिसा’ या चित्रपटाचा ‘वर्ल्ड प्रिमियर’ दाखवण्यात येईल. या महोत्सवात ‘इंडियन पॅनोरमा’ विभागामध्ये एकूण २३ ‘फिचर फिल्म’ आणि २० ‘नॉन फिचर फिल्म’ दाखवण्यात येतील. यापैकी ६ प्रसिद्ध मराठी चित्रपट असतील. या महोत्सवात वैभव क्षिती आणि शार्दुल गोडबोले यांनी दिग्दर्शित केलेला ‘जून’, शशांक उदापूरकर यांचा ‘प्रवास’, मंगशे जोशी यांचा ‘कारखानिसांची वारी’, राज प्रीतम मोरे यांचा ‘खिसा’, हिमांशु सिंह यांचा ‘पांढरा चिवडा’ आणि ओंकार दिवाडकर यांचा ‘स्टील अलाईव्ह’ हे चित्रपट दाखवण्यात येतील, तसेच या चित्रपट महोत्सवात ९ दक्षिण भारतीय चित्रपट दाखवण्यात येतील. या महोत्सवातील गोल्डन पिकॉक अवॉर्डसाठी १५ चित्रपट स्पर्धेत आहेत. यांपैकी कृपाल कलीता यांचा ‘ब्रीज’, सिद्धार्थ त्रिपाठी यांचा ‘अ डॉग अॅण्ड हीज मॅन’, आणि गणेश विनायकन् यांचा ‘थाएन’ हे भारतीय चित्रपट असतील.