कु. गायत्री अनिल यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
१. घराची स्वच्छता करतांना ‘हे माझे घर नसून आश्रम आहे’, असा भाव ठेवून सेवा केल्यावर थकवा न येता घरात चैतन्य जाणवणे
‘मी प्रतिदिन सकाळी घरातील केर काढून लादी पुसते. तेव्हा मला पुष्कळ थकवा येत होता. आता मी ‘हे माझे घर नाही, तर आश्रम आहे’, असा भाव ठेवून आणि ‘देवाला अपेक्षित अशी सेवा होऊ दे’, अशी प्रार्थना करून सेवेला आरंभ करते. तेव्हापासून ‘आधीच्या तुलनेत घर अधिक स्वच्छ दिसत आहे आणि मला येणारा थकवाही जाणवत नाही’, असे माझ्या लक्षात आले. त्यामुळे आता मी संध्याकाळीही लादी पुसते. आता घरातही पुष्कळ चैतन्य जाणवत आहे.
२. अन्न ग्रहण करण्यापूर्वी प्रार्थना केल्यामुळे जेवण जाऊ लागणे
‘काही दिवस मी महाप्रसाद ग्रहण करण्यापूर्वी प्रार्थना करण्यास विसरत होते. त्यामुळे मला जेवण जात नव्हते. मी महाप्रसाद घेण्यापूर्वी प्रार्थना करण्यास आरंभ केला. तेव्हापासून मला जेवण जाऊ लागले आणि अन्न वाया न जाता आनंदाने ग्रहण करता येऊ लागले.
३. ‘दळणवळण बंदीच्या काळात घरात केवळ ५०० रुपये असल्यामुळे काळजी वाटत असतांना कार्यालयातील एक व्यक्ती घरी येऊन वेतन देऊन जाणे’, ही गुरुकृपाच असल्याचे लक्षात येणे
मे मासात माझ्या हातातील सर्व पैसे संपले होते. केवळ ५०० रुपये शिल्लक होते. असलेले पैसे काही कारणासाठी खर्च झाले होते आणि आता दळणवळण बंदीमुळे (‘कोरोना’ या विषाणूचा संसर्ग पसरू नये; म्हणून शासनाने देशभरात दळणवळण बंदी लागू केली होती.) इतक्यात वेतन मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे ५०० रुपये संपल्यावर काहीच उरणार नव्हते. ‘तेव्हा आता काय करायचे’, असा विचार करत असतांना माझ्या कार्यालयातील एक व्यक्ती वेतन घेऊन घरी आली आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. हे केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच शक्य झाले आहे. ‘ते आमच्या प्रत्येक कठीण प्रसंगात आम्हाला साहाय्य करत असतात’, याची मला जाणीव झाली. मी ते पैसे घेतले आणि गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर ठेवून कृतज्ञता व्यक्त केली. ‘मी ते पैसे गुरुदेवांच्या चरणांशीच ठेवतेय’, असे वाटून माझा भाव जागृत होत होता.’
– कु. गायत्री अनिल (१०.६.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |