तिसरे महायुद्ध झाल्यास त्याला उत्तर देण्यास भारत सक्षम ! – तज्ञांचे मत
हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या कार्यक्रमांतर्गत ‘वर्ष २०२१ : भारत आणि विश्व यांच्या समोरील आव्हाने’ या विषयावर ऑनलाईन चर्चासत्र
अनेक द्रष्टे संत आणि भविष्यवेत्ते यांनी येत्या काळात तिसरे महायुद्ध होण्याविषयी, तसेच त्याच्या गंभीर परिणामांविषयी भाष्य अन् भाकिते केली आहेत. कोरोना संकट, अन्य काही देशांमधील युद्धे आणि अशा अनेक कारणांमुळे युद्धसदृश वैश्विक परिस्थिती निर्माण होत असल्याने तिसरे महायुद्ध झाल्यास भारत एक राष्ट्र म्हणून कसे कार्य करील, याविषयी चर्चा करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘वर्ष २०२१ : भारत आणि विश्व यांच्या समोरील आव्हाने’ या विषयावर ‘चर्चा हिंदु राष्ट्राची’ या कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन चर्चासत्र नुकतेच आयोजित करण्यात आले. या चर्चासत्रात संरक्षण आणि विदेशनीती विशेषतज्ञ श्री. अभिजित अय्यर-मित्रा, अमेरिकी संशोधक तथा ‘पीगुरुज्’ संकेतस्थळाचे संपादक श्री. श्री अय्यर, भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सचिव श्री. अनिल धीर आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे सहभागी झाले होते. या चर्चासत्रात सर्व मान्यवरांनी मत व्यक्त करतांना ‘तिसर्या महायुद्धात भारत सक्षमपणे लढा देऊ शकेल’, असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. हा कार्यक्रम फेसबूक आणि यू ट्यूब यांच्या माध्यमांतून ४१ सहस्र ४६७ हून अधिक जणांनी प्रत्यक्ष पाहिला.
भारतियांची चीनविरुद्धची मवाळ नीती पालटायला हवी ! – अभिजित अय्यर-मित्रा
आतापर्यंत चीनचा विस्तार झाला, तो कॅपिटॅलिस्ट (भांडवलशाही) पद्धतीमुळे; परंतु त्यांची वैयक्तिक नीती ही मर्केंटालिस्ट (व्यापारशाही) राहिली आहे. पश्चिमी देश चीनचे मुख्य केंद्र आहे. आपण चीनचे आर्थिक केंद्र बंद करत आहोत. त्यामुळे चीनचे भारताकडे लक्ष आहे. प्रत्यक्ष नाही; मात्र अप्रत्यक्षरित्या चीन तिसर्या महायुद्धाचे कारण होऊ शकतो. भारतातही असे लोक आहेत की, जे चीनशी जोडलेले आहेत. चीनने भारतावर आक्रमण केल्यास पाकिस्तानही भारतावर आक्रमण करू शकतोे; मात्र पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यास चीन कधीच पाकिस्तानच्या साहाय्याला येणार नाही. चीन स्वतःला वाचवण्याचा निश्चित प्रयत्न करेल. ‘चलता है’ अशी भारतियांची मवाळ नीती आता पालटायला हवी. व्हिएतनामसारखे राष्ट्र चीनला अनेक वेळा नमवते. आपण भाषण देण्यामध्ये चांगले असण्यापेक्षा रणनीती चांगली करण्यामध्ये प्रयत्न करायला हवेत.
इस्लामी कट्टरतावाद कसा रोखायचा, हे भारत संपूर्ण जगाला दाखवून देईल ! – अनिल धीर
चीन धमकावण्याचे प्रकार करतो. भारताने लडाखमध्ये दाखवलेल्या सैन्यबळानंतर चीनला भारताची शक्ती समजलेली आहे. त्यामुळे तो नेपाळ आणि श्रीलंका यांना भारतापासून वेगळा करण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र ते शक्य होणार नाही. नेपाळचे भारताशी सांस्कृतिक संबंध असल्याने नेपाळ-भारत मैत्री अबाधित राहील. चीनला भारताशी युद्ध केल्यास महागात पडेल, हे त्याला ठाऊक आहे. इस्लामी कट्टरतावाद कसा रोखायचा, हे भारत संपूर्ण जगाला दाखवून देईल. श्रीलंकेसारखे देश चीनच्या षड्यंत्राला बळी पडत आहेत. भारतीय सैन्य जगातील कोणत्याही सैन्याच्या तोडीस तोड आहे. पाकिस्तानमध्ये कोणत्याही अडचणी आल्यास ते भारताला त्रास देतात. ही त्यांची नित्याची रणनीती आहे.
भारताचे परराष्ट्र संबंधित धोरण अधिक गतीने आणि शिस्तीने कार्यरत व्हायला हवे ! – श्री अय्यर
भारताचे परराष्ट्र संबंधित धोरण अधिक गतीने आणि शिस्तीने कार्यरत व्हायला हवे. चीनला नमवणे तसे अवघड नाही. चीनचे अनेक व्यापार व्हिएतनामकडे जात आहेत. चीन विश्वातील विविध तंत्रज्ञानाची चोरी करून त्याची नक्कल (कॉपी) करतो. त्यामुळे त्याची गुणवत्ता चांगली नाही. व्हिएतनामच्या युद्धातून चीनला मैदानातून पळावे लागले आहे. प्रत्यक्षात चीनने युद्धे जिंकलेली नसल्यामुळे त्यांची शस्त्रे आणि विमाने युद्धात किती चालतील, हा प्रश्नच आहे. प्रत्यक्ष युद्धापेक्षा अन्य तंत्रज्ञान आणि साधने यांचा वापर चीनकडून होऊ शकतो.
विस्तारवाद, स्वार्थ आणि अहंकार यांमुळे विश्व तिसर्या महायुद्धाकडे चालले आहे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
‘येत्या काळात अनेक वैश्विक संकटे येऊ शकतात’, असे अनेक संत आणि द्रष्टे यांनी सांगितले आहे. जगभरात विविध देशांकडून चालू असलेला आर्थिक वर्चस्ववाद, विस्तारवाद, स्वार्थ आणि अहंकार यांमुळे विश्व तिसर्या महायुद्धाकडे चालले आहे. ‘येत्या काळात ४७ लाख लोकांना स्थलांतर करावे लागेल’, असे वैज्ञानिकांनी सांगितले आहे. धर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णाने ‘धर्मो रक्षति रक्षित: ।’, असे वचन दिले आहे. आज विश्वात विज्ञानाच्या आधारे प्रगती होत आहे. या प्रगतीचा अध्यात्म किंवा धर्म हा पाया नसेल, तर ती प्रगती विध्वंसाकडे जाऊ शकते. त्यामुळे मानवाने आध्यात्मिक विकासावर लक्ष द्यायला हवे.
आपत्काळापूर्वी सिद्धतेसाठी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करायला हवा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
या वेळी सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे म्हणाले की, आतापर्यंतच्या धार्मिक इतिहासावरून लक्षात येते की, साधना केल्याने सर्वकाही साध्य करता येते. भारतात व्यापक हिंदूसंघटन करून सर्व स्तरांवर लढण्यासाठी सिद्धता करणे आवश्यक आहे. भारताकडे धर्माची न्याय्य बाजू असल्याने अल्प सैन्य आणि साधनसामग्री असतांनाही श्रीराम, श्रीकृष्ण, आर्य चाणक्य अन् छत्रपती शिवाजी महाराज यांनी युद्धे जिंकली आहेत, हे भारताहून वरचढ असलेल्या चीनने लक्षात घ्यायला हवे. आपत्काळाला प्रारंभ होण्यापूर्वी सिद्धतेसाठी मिळालेल्या या वेळेचा नेमकेपणाने सदुपयोग करायला हवा.