अभिनेता सोनू सूद यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा
मुंबई महापालिकेच्या कारवाईला २ दिवसांची स्थगिती
मुंबई – बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यांना अनधिकृत बांधकाम प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने सोनू सूद यांच्या इमारतीवरील कोणत्याही कारवाईवर १३ जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे.
अनुमती नसतांना सोनू सूद यांनी ६ मजल्यावरील निवासी इमारतीचे उपाहारगृहात रूपांतर केल्याचा आरोप महापालिकेने केला आहे. या संदर्भात महापालिकेने ७ जानेवारी या दिवशी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणात सोनू सूद यांनी बचावासाठी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
यापूर्वीही महापालिकेने सोनू सूद यांना अनधिकृत बांधकामांविषयी नोटीस बजावली होती. अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार सोनू सूद यांनी या नोटीसच्या विरोधात दिवाणी न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती; पण तेथून त्यांना काहीच दिलासा मिळाला नाही. सोनू सूद यांनी नियमांचे पालन न करता अनधिकृत बांधकाम केले, असे तक्रारीत म्हटले आहे. अनुमती न घेता निवासी ठिकाण व्यावसायिक श्रेणीमध्ये सुधारित केले गेले होते. याविषयी सप्टेंबर २०२० या दिवशी नोटीस देण्यात आली होती. हा कालावधी २६ नोव्हेंबर २०२० या दिवशी संपला होता. त्यानंतर सोनू सूद यांनी उत्तर दिले नाही. पुन्हा ४ जानेवारी या दिवशी पडताळणी करण्यात आली, तेव्हा सोनू सूद यांनी नोटीसला उत्तर न देता अनधिकृत बांधकाम पूर्ण केल्याचे आढळले.