वाळू चोरी प्रकरणातील ६ जण पंढरपूर तालुक्यातून हद्दपार
हद्दपार केल्यावर गुन्हेगार नवीन ठिकाणी गुन्हे करण्यास मोकळे होतात ! त्यांच्यावर कठोर कारवाईच हवी !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – अनेक गुन्हे नोंद केल्यानंतरही वाळू चोरी करणार्या ६ जणांना पंढरपूर तालुक्यातून हद्दपार करण्याची कारवाई पोलिसांनी केली आहे. उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी हे आदेश काढले आहेत. येथे शहर आणि तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रातून अनेक वाळू चोर रात्रंदिवस वाळूची चोरी करत आहेत. पोलीस आणि महसूल विभागाकडून अधूनमधून या वाळू चोरांच्या विरोधात पोलिसांत गुन्हे नोंद केले आहेत; मात्र वाळू चोरांकडून सातत्याने वाळू चोरी केली जाते.
जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी वाळू चोरांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सूरज पवार, महादेव काळे, रामा बंदपट्टे, लहू बाबू चव्हाण, नागेश शिवाजी घोडके, ऋतिक तथा दादा अरुण लामकाने या ६ वाळू चोरांना हद्दपार करण्यात आले आहे. (वाळू चोरांवर केवळ हद्दपारीची कारवाई करणे म्हणजे त्यांना अन्यत्र चोरी करण्यास मोकळे रान देण्यासारखे आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई अपेक्षित ! – संपादक)