युवकांमध्ये नचिकेताचा अभाव, हीच देशाची शोकांतिका !
१२ जानेवारी या दिवशी ‘स्वामी विवेकानंद जयंती’ आणि ‘राष्ट्रीय युवक दिन’ आहे. यानिमित्ताने…
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारत सरकारने वर्ष १९८४ पासून प्रतिवर्षी ‘१२ जानेवारी’ हा दिवस ‘राष्ट्रीय युवक दिन’ म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. गेल्या ३६ वर्षांपासून हा दिवस शासकीय पातळीवरून देशभर साजरा केला जातो. या दिवशी विविध कार्यक्रमांमधून मोठमोठे वक्ते, राजकारणी यांची भाषणे होतात. ‘देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी विवेकानंद यांचे विचार युवकांनी आत्मसात करावेत’, असे आवाहन केले जाते. तो दिवस संपला की, दुसर्या दिवशी नेहमीप्रमाणे दिनक्रम चालू होतो. पुन्हा पुढील वर्षी तसेच सोहळे होतात; पण या ३६ वर्षांचा आढावा घेतल्यास स्वामी विवेकानंद यांचे विचार किती युवकांमध्ये रुजले, हा संशोधनाचा विषय आहे.
स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची आवश्यकता !
स्वामी विवेकानंद एकूण ३९ वर्षांचे आयुष्य जगले. या कार्यकाळात त्यांनी हिंदु धर्माची महानता सातासमुद्रापार पोचवली. त्यांनी हिंदु संस्कृती किती परमोच्च आहे, हे जगाला दाखवून दिले. आजही शिकागोतील धर्म परिषदेचा प्रसंग आठवला की, आमची मान अभिमानाने वर जाते. जवळजवळ त्यांच्या जीवनकाळाइतकी वर्षे देशात सरकारी पातळीवरून लाखो रुपये व्यय करून जयंती साजरी केली जाते; पण हिंदु धर्माची महानता जगात पोचवणे सोडून द्या, ‘हिंदु’ हा शब्द उच्चारणेदेखील अपराधीपणाचे आणि मागासलेपणाचे वाटू लागले आहे, हे कटूसत्य कुणीही नाकारू शकत नाही. ही गोष्ट अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी आहे. मग आम्ही ३६ वर्षांत कुठे चुकलो, याचे चिंतन करण्याची आज आवश्यकता आहे. सारासार विचार केला असता लक्षात येते की, विवेकानंद यांचे विचार बाल्यावस्थेपासून शिकवले गेले नाहीत. त्यामुळेच त्यांच्या विचारांची युवा पिढी निर्माण झाली नाही, असे खेदाने म्हणावे लागते. स्वामी विवेकानंद यांना हवा होता नचिकेतासारखा युवक ! ते म्हणतात, ‘‘मला नचिकेतासारखे १०० युवक द्या, मी देशाचे भवितव्य पालटवून दाखवतो.’’
अमरत्वाचे रहस्य जाणण्यासाठी कोणत्याही आमिषाला बळी न पडणारा नचिकेत !
नचिकेताचे चरित्र कठ उपनिषदामध्ये सविस्तर दिले आहे. नचिकेत वाजश्रवा ऋषींचा पुत्र. यमदेवतेचे नाव घेतले, तरी अनेकांचा भीतीने थरकाप उडतो. अशा यमदेवाला स्वतःहून सामोरे जाऊन अमरत्वाचे रहस्य जाणून घेणारा, असा हा नचिकेत ! मृत्यूला न घाबरणारा, इंद्रियांवर विजय मिळवलेला आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणारा नचिकेत आजच्या युवकांमध्ये दिसत नाही.
‘सुखाच्या लालसेने मनुष्य ज्या गोष्टींसाठी आयुष्यभर कष्ट करत रहातो, त्या सर्व गोष्टी मी तुला देतो. राजवैभव तुला देतो. सृष्टीच्या अंतापर्यंत जिवंत राहून सर्व सुखाची साधने तुला प्रदान करतो. हवे ते माग; पण अमरत्वाचे रहस्य जाणून घेण्याचा विचार सोडून दे’, असे आमीष त्याला यमराज दाखवतात. असे असले तरी नचिकेत आपल्या निश्चयापासून ढळत नाही; कारण या सुखाच्या वस्तूंमधून चिरंतन आनंद रहात नाही, हे तो जाणून होता. त्याचा हा दृढनिश्चय पाहून अखेर यमदेव प्रसन्न होतात आणि अमरत्वाचे रहस्य सांगतात. मनुष्याच्या उन्नतीचा मार्गही सांगतात. याच संवादातून ‘श्रेयस’ आणि ‘प्रेयस’ या दोन प्रवृत्तींचा उदय झाला. ‘केवळ आवडत्या आणि प्रिय मार्गाने जाऊ नकोस, तर भले तुला आवडले नाही, तरी सर्वोच्च पदावर पोचलेले संत, महात्मे, सिद्ध ज्या मार्गाने गेले, त्याचा अभ्यास कर आणि त्या मार्गाने पुढे जा, यातच खरे कल्याण आहे’, हा मंत्र यमदेवांनी नचिकेताला दिला.
नचिकेताचे उत्तुंग चरित्र बालपणीच शाळांमधून शिकवणे आवश्यक !
सध्या भोगवादी प्रवृत्ती बोकाळली आहे. त्यामुळे युवा पिढीही चंगळवादी बनली आहे. या कारणानेच समाजमन सध्या अशांत झाले आहे. ज्यांना आम्ही देशाचे भावी नागरिक म्हणत आहोत, ती पिढी दिशाहीन झाली आहे. अशा दिशाहीन पिढीला योग्य दिशा मिळण्यासाठी नचिकेतासारखे उत्तुंग चरित्र बालपणीच शाळांमधून शिकवले गेले पाहिजे. आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अपेक्षित असे पालट शिक्षणव्यवस्थेत करण्याचा कृतीसंकल्प केल्यास त्यांना खरी आदरांजली ठरेल.
– सौ. समृद्धी गरुड, पर्वरी, गोवा.