देवी सीतामातेविषयी अश्‍लाघ्य विधान करणार्‍या तृणमूल काँग्रेसच्या खासदारच्या विरोधात गुन्हा नोंद

पाकमध्ये ज्या प्रमाणे ईशनिंदा करणार्‍यांना फाशीची शिक्षा देतात, तशीच शिक्षा आता भारतातही हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांना देणे आवश्यक आहे. तेव्हाच हिंदु धर्म, देवता आदींचा अवमान रोखला जाईल; मात्र त्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही, हेही तितकेच वास्तव आहे !

कल्याण बॅनर्जी

कोलकाता (बंगाल) – राज्यातील तृणमूल काँग्रेसचे खासदार आणि कोलकाता उच्च न्यायालयातील अधिवक्ता कल्याण बॅनर्जी यांनी देवी सीतामाता यांच्याविषयी अनुद्गार काढल्यावरून त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भाजप युवा मोर्चाचे सदस्य आशीष जयस्वाल यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जयस्वाल यांनी म्हटले आहे, ‘बॅनर्जी यांनी हिंदूंची क्षमा मागितली पाहिजे.’ बॅनर्जी यांच्या उद्गाराचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

बॅनर्जी यांनी काढलेले अश्‍लाघ्य अनुद्गार !


बॅनर्जी एका निवडणूक प्रसारातील सभेमध्ये बोलतांना म्हणाले की, सीता रामाजवळ जाऊन म्हणाली की, माझे भाग्य चांगले होते की, माझे अपहरण रावणाने केले, जर तुमच्या भगवे वस्त्र धारण करणार्‍या शिष्यांनी माझे हरण केले असते, तर माझी स्थिती उत्तरप्रदेशातील हाथरस (येथे झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील पीडित तरुणीचा काही दिवसांनी मृत्यू झाला.) प्रकरणासारखी झाली असती.