मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहातील समस्यांविषयी महापालिका आयुक्तांना निवेदन
सांगली, ११ जानेवारी (वार्ता.) – मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहाच्या विविध समस्यांविषयी इंद्रधनू कलाविष्कार संस्था मिरज यांच्या वतीने ११ जानेवारी या दिवशी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना निवेदन देण्यात आले. यानंतर आयुक्तांसमवेत सर्व सूत्रांवर सविस्तर चर्चा झाली. आयुक्तांनी येत्या २ दिवसांत नाट्यगृहातील सर्व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक बोलावली असून आयुक्तांच्या भूमिकेचे सर्व रंगकर्मींनी स्वागत केले आहे. या वेळी सर्वश्री धनंजय जोशी, राजेंद्र नातू, श्रेयस गाडगीळ उपस्थित होते. या संदर्भात संस्थेने नगरविकासमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनाही निवेदन दिले होते.
रंगकर्मींशी चर्चा झाल्यावर बालगंधर्व नाट्यगृहाच्या परिसरातील कचरा घंटागाड्या तात्काळ हटवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या, तसेच नाट्यगृहात तात्काळ देखभाल दुरुस्तीसाठी कर्मचार्यांची नेमणूक केली.