जगातील ९ देशांकडून भारताकडे स्वदेशी कोरोना लसीची मागणी !

नवी देहली – भारताने कोरोनावरील स्वदेशी लसीची निर्मिती केली असून त्याच्या आपत्कालीन वापराला अनुमती दिली आहे. यानंतर जगातील ९ देशांनी भारताकडे या संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या लसीची मागणी केली आहे. ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ‘भारताने ब्राझिलला लसीचा तात्काळ पुरवठा करावा’ अशी मागणी केली आहे. असे असले, तरी भारताने याविषयी ठरवलेल्या धोरणानुसार प्रथम भारताच्या शेजारी देशांना ही लस देणार आहे. त्यानंतर जगभरातील इतर देशांमध्ये कोरोनाची लस पाठवली जाणार आहे.

(सौजन्य : वनइंडिया हिन्दी)

ब्राझिल, मोरक्को, सौदी अरेबिया, म्यानमार, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आदी देशांनी भारताकडे कोरोना प्रतिबंधात्मक लसीची मागणी केली आहे. भारत सर्वप्रथम बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांसारख्या देशांना आधी लसींचा पुरवठा करणार आहे.

चीनकडून भारतीय लसीचे कौतुक

चीनने भारतीय बनावटीच्या कोरोना लसीचे कौतुक केले आहे.

‘दक्षिण आशियातील आमच्या शेजारच्या देशाने बनवलेली कोरोना लस ही गुणवत्तेच्या दृष्टीने कोणत्याही लसीपेक्षा अल्प नाही’, असे चीनने म्हटले आहे. चीनचे सरकारी वर्तमानपत्र ‘ग्लोबल टाइम्स’मधील एका लेखात हे कौतुक करण्यात आले आहे.