तंबाखूजन्य वस्तूंची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी वैभववाडी पोलिसांकडून खाजगी बसचालकावर कारवाई
वैभववाडी (सिंधुदुर्ग) – खाजगी बसमधून तंबाखूजन्य वस्तूंची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी चालक इंदरसिंह हिरालालजी गुजर (वय ४५ वर्षे) आणि वाहक भैरू शंभूनाथ (वय ४३ वर्षे) या दोघांना वैभववाडी पोलिसांनी कह्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवला. करूळ तपासणी नाक्यावर १० जानेवारी या दिवशी ही कारवाई करण्यात आली.
बसमध्ये हुक्का ओढण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी, कोळसा, तसेच दुसर्या एका बॅगेत वैधानिक चेतावणी नसलेली सिगारेटची पाकिटे निदर्शनास आली. बसमधून एकूण २४ सहस्र रुपयांची सिगारेटची पाकिटे आढळली. अशा प्रकारे २४ सहस्र रुपयांच्या मुद्देमालासह १० लाख रुपयांची खाजगी बस जप्त करण्यात आली. गाडीतील प्रवाशांना दुसर्या गाडीतून पाठवण्यात आले. दोन्ही आरोपींना ११ जानेवारी या दिवशी कणकवली न्यायालयात उपस्थित करण्यात येणार आहे.