मास्क न वापरणार्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गोव्यातील जनतेची मागणी
अशी मागणी का करावी लागते, हे प्रशासनाला लक्षात येत नाही का ?
पणजी, १० जानेवारी (वार्ता.) – सध्या गोव्यात अनेक पर्यटक येत आहेत. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्यासंबंधीचे नियम अनेक पर्यटक आणि काही स्थानिक पाळत नसल्याने मास्क न वापरणार्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी गोव्यातील बहुतांश नागरिकांकडून होत आहे. आतापर्यंत गोवा पोलिसांनी मास्क न वापरणार्या ६६ सहस्र लोकांविरुद्ध कारवाई केली आहे. यांपैकी उत्तर गोव्यात २९ सहस्र आणि दक्षिण गोव्यात ३७ सहस्र लोकांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांशिवाय शासनाने पंचायत सचिव आणि नगरपालिका यांना मास्क न वापरणार्यांवर कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत. मास्क वापरण्यासंबंधी लोकांमध्ये जागृती करण्याची मोहीम घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
२३ नोव्हेंबर २०२० या दिवशी शासनाने मास्क न वापरणार्यांसाठीची दंडाची रक्कम १०० रुपयांवरून वाढवून २०० रुपये केली आहे. याविषयी पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोग्याचा विचार न करता पर्यटक आणि काही स्थानिक लोक मास्क गांभीर्याने वापरत नाहीत. मास्क लावण्याविषयीचे महत्त्व सर्वांना ठाऊक आहे; परंतु जेव्हा मास्क घालण्याचा प्रश्न येतो, तेव्हा प्रतिसाद अल्प असतो. अनेक लोक मास्क घालतात; परंतु तो मानेभोवती किंवा अर्धवट स्थितीत असतो. ‘काही लोक श्वास घेण्यास त्रास होतो’, असे कारण पुढे करतात. काही पर्यटक छायाचित्र घेण्यासाठी मास्क काढला आणि नंतर विसरलो, असे कारण देतात. दंड टाळण्यासाठी अशी कारणे देऊनही आम्ही त्यांच्याकडून दंड वसूल करतो. (असे असूनही ख्रिस्ती नववर्षानिमित्त गोव्यातील समुद्रकिनार्यांवर आलेल्या पर्यटकांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे आदी कोरोनाविषयीचे कोणतेही नियम पाळले नाहीत. त्या वेळी पोलीस काय करत होते ? त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी कोणाचा दबाव होता का ? – संपादक) लोकांचे म्हणणे आहे की, गणवेशात असलेले पोलीस केवळ उपस्थित असले तरी लोक मास्क घालतात, कारण मास्क न घातल्यास दंड होईल हे लोकांना ठाऊक आहे.