मेळावली येथील आय.आय.टी. प्रकल्पाच्या भूसर्वेक्षणाचे काम उद्या चालू रहाणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
पणजी – मेळावली येथे आय.आय.टी. प्रकल्प उभारण्याविषयी गोवा शासन ठाम आहे. या प्रकल्पाला तेथील स्थानिक ग्रामस्थांचा विरोध आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार येथील अंदाजे १७ ग्रामस्थ कुटुंबीय प्रकल्पासाठीच्या सरकारी भूमीवर लागवड करतात. त्यांच्यासाठी सपूर्ण गावाला प्रकल्पापासून वंचित ठेवू शकत नाही. गेल्या काही दिवसांत या प्रकल्पाच्या भूसर्वेक्षणाला ग्रामस्थांकडून तीव्र विरोध झाला होता. या वेळी काही महिला पोलीस आणि पोलीस निरीक्षकही घायाळ झाले होते. ग्रामस्थांनी तीक्ष्ण हत्यारे, तसेच मिरचीपूड असलेले पाणी वापरून पोलिसांवर आक्रमण केल्याचा पोलिसांचा दावा आहे. काही अशासकीय संस्था आणि विरोधी पक्ष यांनी चिथावणी दिल्यामुळे हा विरोध वाढला. ३ दिवस बंद असलेले भूसर्वेक्षणाचे काम उद्या पुन्हा चालू होणार, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. मी पुन्हा ग्रामस्थांना आवाहन करतो की, त्यांनी आक्रमक न होता सरकारशी संवाद साधावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
१० जानेवारीला मेळावली येथे शांतता होती आणि कुणालाही अटक झाली नाही. पोलिसांची संख्याही अल्प होती. ग्रामस्थांचा एक गट सरकारच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रानात बसला होता.