केंद्राकडून शिष्यवृत्तीसाठी ५९ सहस्र कोटी रुपयांची तरतूद ! – सुनील कांबळे, भाजप
कोल्हापूर – मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने ५९ सहस्र रुपयांची तरतूद केली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते. असे असतांना विरोधक केंद्र सरकारवर खोटा आरोप करत आहेत, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनिल कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केले. आमदार कांबळे पुढे म्हणाले, ‘‘केंद्र सरकार मागासवर्गीय शिष्यवृत्ती बंद करण्याच्या पवित्र्यात असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. आरक्षण रहित करण्याच्या हालचालीही चालू असल्याचा अपप्रचारही विरोधकांकडून केला जातो; मात्र प्रत्यक्षात केंद्र सरकारने मागासवर्गियांच्या विकासासाठी विविध योजना चालू केल्या आहेत. पूर्वी शिष्यवृत्ती महाविद्यालयांच्या खात्यात जमा व्हायची. महाविद्यालये शैक्षणिक शुल्काची रक्कम काढून घेऊन उर्वरीत रक्कम विद्यार्थ्यांना द्यायचे; मात्र आता केंद्र सरकारने महाविद्यालयाचे शुल्क त्यांच्या खात्यात आणि उर्वरीत रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यास प्रारंभ केला आहे.’’
‘एक गाव, एक पाणवठा, एक स्मशान भूमी’
कांबळे पुढे म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात भाजपकडे सर्वाधिक ग्रामपंचायती आहेत. या तालुक्यातील १०० पेक्षा अधिक गावांमध्ये भाजप आणि संघ परिवारातील संस्थांनी ‘एक गाव, एक पाणवठा आणि एक स्मशानभूमी’ ही संकल्पना राबवली. येथे खर्या अर्थाने सामाजिक समता प्रस्थापित झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस केवळ समतेच्या गप्पा मारतात.