पतंजली योग समितीच्या वतीने १२ जानेवारी या दिवशी बांदा येथे ‘सूर्यनमस्कार दिन’
सावंतवाडी – येथील बांदा पंचक्रोशी पतंजली योग समिती आणि गोवा राज्य पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मकरसंक्रांतीचे औचित्य साधून १२ जानेवारी या दिवशी बांदा येथे ‘सूर्यनमस्कार दिन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदाच्या पटांगणावर सकाळी ७.३० वाजता या कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे.
आरोग्यरक्षण हे आता सर्वांत महत्त्वाचे बनले आहे. उत्तम आरोग्यासाठी सूर्यनमस्कार हे सर्वोत्तम साधन आहे. सूर्यनमस्काराचे महत्त्व सर्वत्र पसरवण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह मकरंद तोरसकर, तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य श्वेता कोरगांवकर, पंचायत समिती सभापती मानसी धुरी, उपसभापती शीतल राऊळ, सरपंच अक्रम खान, माजी सरपंच मंदार कल्याणकर, इंडियन योगा असोसिएशन गोवा विभाग अध्यक्ष कमलेश बांदेकर, उपाध्यक्ष विश्वास कोरगांवकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.