पत्रकारांना हक्कांसाठी लाचार होण्याची वेळ येऊ देणार नाही ! – सुधीर केरकर, संचालक, माहिती आणि प्रसिद्धी खाते
गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या वतीने पत्रकारांचा सत्कार
पणजी, १० जानेवारी (वार्ता.) – निवृत्त झालेले संपादक आणि पत्रकार यांची माहिती गोळा करून त्यांना माहिती अन् प्रसिद्धी खात्यात सामावून घेण्यात येईल. संचालकपदी असेपर्यंत पत्रकारांना हक्कासाठी लाचार होण्याची वेळ येऊ देणार नाही’, असे आश्वासन माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे सुधीर केरकर दिले. गोमंतक साहित्यसेवक मंडळाच्या वतीने नुकताच मराठी पत्रकारदिन साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे या नात्याने सुधीर केरकर बोलत होते. सुधीर केरकर यांच्या हस्ते या वेळी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुर्डीकर, अरविंद धुरी, जनार्दन नागवेकर आणि रामनाथ देसाई यांचा सत्कार करण्यात आला.
सुधीर केरकर पुढे म्हणाले, ‘‘आपल्याकडे काहीच नसते, तेव्हा संयम हवा आणि सगळे काही असते, तेव्हा दृष्टीकोन हवा’, हा डॉ. अब्दुल कलाम यांचा विचार महत्त्वाचा आहे. चांगल्या उपक्रमांना माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे नेहमीच सहकार्य असेल.’’
सत्काराला उत्तर देतांना ज्येष्ठ पत्रकार रामनाथ देसाई म्हणाले, ‘‘ग्रामीण भागात पत्रकारिता करतांना मला ज्येष्ठ संपादकांचा पाठिंबा मिळाला. मी निर्भीड पत्रकारिता केली आणि कधीही लाचारी पत्करली नाही.’’ या वेळी इतर सत्कारमूर्तींनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मंडळाचे अध्यक्ष रमेश वसकर यांनी स्वागत, उपाध्यक्ष शंभू भाऊ बांदेकर यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन, तर लिना पेडणेकर यांनी आभार मानले.