लहानपणापासून मनमिळाऊ, काटकसरी आणि परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अपार भाव असलेल्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. प्रियांका लोटलीकर !
‘कु. प्रियांका लोटलीकर रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करतात. त्यांनी लहानपणी काढलेली चित्रे पाहून परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांचे कौतुक केले होते. त्यांच्यामध्ये लहानपणापासूनच सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता आहे. त्यांच्या आईला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. मनमिळाऊ
‘प्रियांका लहान असतांना आमचे पोळी-भाजी विक्रीचे केंद्र होते. तेव्हा मी प्रतिदिन माझे आवरून दुकानात जात असे. तेव्हा प्रियांका कधीही ‘माझ्यासाठी घरी थांब’, असे मला म्हणाली नाही. ती स्वतःचे आवरून शाळेत जायची. तिची शाळेत जातांना कधीच तक्रार नसायची. अन्य मुलांप्रमाणे तिच्याविषयी शाळेतून कधी तक्रारी आल्या नाहीत. ती सर्वांशी जुळवून घेत असे.
२. काटकसरी वृत्ती
तिला चित्रे काढण्यासाठी लागणारी पेन्सिल, पेन आणि कागद या वस्तू किमती (महाग) असायच्या. ‘त्यांचा वापर काटकसरीने करायचा असतो’, याची तिला जाणीव होती. प्रियांकाचे दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्याच वर्षी तिच्या वडिलांनी साधना करण्यासाठी नोकरी सोडली. त्या वेळी तिने कसलाही हट्ट केला नाही. ती आमच्याकडे शिक्षणासाठी लागतील, तेवढेच पैसे मागत असे. ती अनावश्यक व्यय कधीच करत नसे. तिच्या वडिलांनी नोकरी सोडल्यावर आमची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती; पण अमेय (मुलगा) आणि प्रियांका यांनी कधीही विरोध केला नाही किंवा कुठलाही हट्ट केला नाही. हे केवळ गुरूंच्या कृपेनेच शक्य झाले आहे.
३. तिला पूर्वीपासूनच कुठल्याही कार्यक्रमाला जाण्याची हौस नव्हती. आम्ही सर्वांनी आग्रह केला, तरीही ती यायचे टाळत असे.
४. लहानपणापासून शिक्षणापेक्षा चित्रकलेची आवड असल्यामुळे ‘कमर्शियल आर्ट’चे शिक्षण जिद्दीने पूर्ण करणे
प्रियांका लहान असल्यापासूनच चित्रकलेच्या वर्गाला जात होती. तेथील शिक्षक फार कडक होते, तरीही ती कधीच कंटाळली नाही कि तिने कधी तक्रार केली नाही. तिला अभ्यास करायला आवडत नसे; पण चित्रे काढायला पुष्कळ आवडायचे. त्यामुळे तिने दहावीनंतर ‘कमर्शियल आर्ट’चे शिक्षण घेतले. तिला वरळी येथील एका महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता; पण तेथील शिक्षणासाठी पुष्कळ पैसे द्यावे लागणार होते आणि तेथील वातावरणही प्रियांकाला आवडले नव्हते. त्यामुळे तिने बांद्रा येथील रहेजा महाविद्यालयात प्रवेश घेतला. ते महाविद्यालय आमच्या घरापासून दूर आहे, तरीही तिने शिक्षण जिद्दीने पूर्ण केले.
एकदा तिला चित्रकलेच्या परीक्षेत पारितोषिक मिळाले होते. ‘कमर्शियल आर्ट’चे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला अर्धवेळ नोकरीसाठी बोलावणे आले होते.
५. सात्त्विक गोष्टींची आणि देवाची आवड असणे
अ. तिला लहानपणापासूनच सात्त्विक गोष्टी वापरायला आवडतात.
आ. तिला पूर्वीपासून निसर्गाची आवड आहे.
इ. ती लहान असतांना तिची आजी तिला आमच्या गावातील महाकालीदेवीच्या मंदिरात घेऊन जायची. नवरात्रीत किंवा तिचे बाबा कधी गावाला गेल्यास ती त्यांना देवीची ओटी भरायला सांगायची.
ई. माझ्या माहेरची कुलदेवी आर्यादुर्गा आहे. एकदा प्रियांकाने माझ्या वहिनीला भ्रमणभाष करून त्या देवीची साडी-चोळीने ओटी भरायला सांगितले. प्रियांका नेहमी ‘देवतांचे आशीर्वाद मिळावेत’, यासाठी प्रयत्न करते.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कु. प्रियांकाने काढलेली चित्रेे आवडल्याने त्यांनी तिला पेन्सिल आणि पेन देऊन आशीर्वाद देणे
प्रियांका लहान असतांना एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले आमच्या घरी आले होते. तेव्हा त्यांना प्रियांकाने काढलेली काही चित्रे दाखवली. गुरुदेवांना ती चित्रे आवडली. त्यामध्ये एक गुरुकृपायोगाचा ‘लोगो’ होता आणि एक गणपतीचे चित्र होते. गुरुदेवांनी ती चित्रे पाहून तिला ‘पेन्सिल’ आणि ‘पेन’ दिले अन् ते म्हणाले, ‘‘अनुनंतर (आताच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्यानंतर) चित्रकलेमध्ये तुझा नंबर असेल.’’ परात्पर गुरुदेवांनी तिला आशीर्वाद दिला.
७. डोंबिवलीहून मिरज आश्रमात एकटी जाणे
वर्ष २००२ – २००३ मध्ये सूक्ष्मातून दुर्गादेवी मिरज आश्रमात येणार होती. तेव्हा ‘सूक्ष्म परीक्षण कसे करायचे ?’, हे शिकण्यासाठी प्रियांकाला मिरज आश्रमात बोलावले होते. तेव्हा प्रियांकाचे वय १८ वर्षे होते. ती एकटीच भांडुपहून मिरज आश्रमात गेली.
८. महाविद्यालयातून घरी येतांना सर्वत्र मोठा पूर आल्यावर अंधारातून आगगाडीच्या रुळांमधून चालत मुलुंडपर्यंत येणे आणि त्या वेळी परात्पर गुरुदेवांनी तिला वाचवले असल्याचे लक्षात येणे
वर्ष २००५ मध्ये अतिवृष्टीमुळे मोठा पूर आला होता. त्या दिवशी प्रियांका महाविद्यालयात गेली होती. आम्ही तिला दूरभाष करून नातेवाइकांकडे रहायला जायला सांगत होतो; पण त्या बाजूला पाऊस अल्प झाल्यामुळे ती घरी येत होती. ती ज्या आगगाडीतून प्रवास करत होती, ती आगगाडी भांडुपपर्यंत आली असतांना पाणी वाढू लागले. तेव्हा रात्रीचे ८ – ८.३० वाजले होते. आगगाडी मध्येच थांबली. सर्व प्रवासी आगगाडीतून खाली उतरले. प्रियांका अंधारातून आगगाडीच्या रुळांमधून चालत मुलुंडपर्यंत आली. तेव्हा तिच्या गळ्यापर्यंत पाणी आले होते आणि अशा पुरातून ती चालत आली. ती त्या वेळी घाबरली नव्हती. तेव्हा ‘परात्पर गुरुदेवांनी तिला वाचवले’, असे लक्षात आले. (ती मुलुंड येथे आल्यानंतर तिचा एकदाच दूरभाष आला. तेथे तिच्या बाबांची मावशी रहाते. आम्ही तिला त्यांचा जेमतेम पत्ता सांगितला असेल आणि नंतर दूरभाष बंद झाला.) ती आजीकडे सुखरूप पोचली. हे सर्व आठवल्यावर लक्षात येते, ‘प्रियांकाच्या समवेत प्रत्यक्ष भगवान विष्णु, म्हणजेच गुरुदेव होते.’
९. तत्त्वनिष्ठ
९ अ. आई-वडिलांना चूक सांगून त्यांना प्रायश्चित्त घ्यायला सांगणे : आमचे डोंबिवलीचे घर लहान आहे; म्हणून अमेयने (मुलाने) शेजारचे मोठे घर घेण्याचा विचार केला. मला आणि यजमानांना ते आवडले नव्हते. ‘आता आपत्काळात घर घेणे आवश्यक आहे का ?’, असा विचार आमच्या मनात येत होता. मी याविषयी प्रियांकाला सांगितले. तेव्हा तिने हा प्रसंग एका संतांना सांगितला. ते संत तिला म्हणाले, ‘‘आई-वडिलांनी साक्षीभावाने पहाण्याच्या टप्प्यात जायला पाहिजे होते.’’ तेव्हा तिने संतांचा निरोप मला सांगून आम्हाला प्रायश्चित्त घ्यायला सांगितले.
९ आ. आई-वडिलांना प्रत्येक चूक तत्त्वनिष्ठतेने सांगणे : मी तिला काही प्रसंग सांगितल्यावर ती म्हणते, ‘‘सर्व गोष्टी विचारून करायच्या असतात. तू विचारून घेतेस का ? विचारून घे आणि प्रायश्चित्तही घे.’’ त्या वेळी ती ‘आई-बाबांना कसे सांगू’, असा विचार करत नाही. ती प्रत्येक चूक तत्त्वनिष्ठतेने सांगते.
१०. आधीपासून भित्रा स्वभाव असूनही आश्रमात रहायला गेल्यावर सेवेचेे दायित्व घेणे
प्रियांका लहानपणी फार भित्री होती. ती दुसर्या इयत्तेत शिकत असतांना तिच्या शाळेत एक कार्यक्रम होता. त्यात तिला एका गाण्यावर नृत्य करायचे होते. त्या कार्यक्रमाला तिचे वडील गेले होते. तेव्हा ती पुष्कळ घाबरली होती. तिला काहीच जमले नाही. त्यानंतर तिने पुन्हा कधीच कार्यक्रमात भाग घेतला नाही. तिने कधी अधिकोषात जाऊन पैसे काढून आणले नाहीत. तिला रेल्वेचे तिकीट काढून आणायलाही जमत नसे; मात्र ती आश्रमात गेल्यानंतर दायित्व घेऊन सेवा करते. केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळेच तिला हे शक्य झाले आहे. त्याविषयी आम्ही गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.
११. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता
११ अ. आईला आध्यात्मिक त्रास असल्याचे चित्रातून दाखवणे : ‘प्रियांकांमध्ये लहानपणापासूनच सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता आहे’, हे तेव्हा लक्षात आले नव्हते. वर्ष २००२ – २००३ मध्ये माझा आध्यात्मिक त्रास वाढला होता. तेव्हा मी देवद आश्रमात होते. प्रियांका आणि मी गुरुदेवांना भेटायला गेलो असतांना माझ्या मनात ‘आता मला सेवा किंवा साधना करता येणार नाही. मला काही जमणार नाही’, असे विचार येत होते. मी गुरुदेवांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी प्रियांकाला सांगितले, ‘‘आईचा त्रास वाढला आहे. तू तिचे चित्र काढून दाखवायला आण.’’ तेव्हा तिने मला त्रास असल्याचे दाखवणारे चित्र काढले होते. तेव्हा ‘तिला सूक्ष्मातील समजते’, हे लक्षात आलेे.
११ आ. सौ. अल्पना जोशी यांच्या सासर्यांना कधीच पाहिलेले नसतांना त्यांचे हुबेहूब चित्र काढणे : एकदा प्रियांकाला डोंबिवली येथील सौ. अल्पना जोशी यांच्या मृत सासर्यांचे चित्र काढायला सांगितले होते. प्रियांकाने त्यांना कधीच पाहिले नव्हते. नंतर आजोबांचे एक जुने छायाचित्र पहायला मिळाल्यावर प्रियांकाने काढलेले आजोबांचे चित्र हुबेहूब तसेच असल्याचे पाहून ‘तिला सूक्ष्मातील समजते’, हे लक्षात आले.
१२. परात्पर गुरु डॉक्टर यांच्याप्रती भाव
१२ अ. मोठी झाल्यावर प.पू. डॉक्टरांकडेच जाणार असल्याचे सांगणे आणि तिचे बोल तंतोतंत खरे ठरणे : वर्ष १९९७ मध्ये परात्पर गुरु डॉक्टर प्रवचन झाल्यानंतर आमच्या घरी आले होते. प्रियांका लहान असल्यामुळे आम्ही तिला तिच्या आत्याकडे पाठवले होते. तेव्हा ‘गुरुदेवांना भेटता आले नाही’, याचे तिला फार वाईट वाटले. तेव्हा ती म्हणाली, ‘‘आता मला भेटायला मिळाले नाही; पण मी नंतर प.पू. डॉक्टरांकडेच जाणार आहे.’’ तिचे ते बोलणे तंतोतंत खरे झाले आहे.
१२ आ. गुरुदेवांनी दिलेल्या वस्तू जपून ठेवणे : गुरुदेवांनी कधी तिला चॉकलेट दिल्यास प्रियांका त्याचे वेष्टन जपून ठेवत असे. तिला परात्पर गुरुदेवांनी लिहिलेला कागद कुठे मिळाला, तरी ती त्याचे कात्रण काढून जपून ठेवत असे. ती पाचवी-सहावीत असतांना दिवाळीमध्ये गुरुदेवांनी तिला एक ‘स्कर्ट’ दिला होता. तिने तो अजूनही जपून ठेवला आहे. ती त्यांनी दिलेली प्रत्येक वस्तू जपून ठेवते. तिला चैतन्य मिळण्यासाठी गुरुदेवांनी एक झब्बा दिला होता. तो ती झोपतांना घालते किंवा उशाजवळ ठेवते. ती झोपतांना गुरुदेवांचे छायाचित्र जवळ ठेवते.
१२ इ. गुुरूंनी सांगितलेले ऐकणे : वर्ष २००५ मध्ये तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुदेवांनी तिला ‘परीक्षा झाल्यावर काही दिवस गोव्याला ये’, असे सांगितले. तिची गुरुदेवांवर अपार श्रद्धा असल्याने शिक्षण पूर्ण झाल्यावर काही दिवसांतच ती गोव्याला गेली. तिचा महत्त्वाचा गुण म्हणजे ‘गुरूंचे ऐकणे’, हा आहे. तिने भविष्याचा काहीच विचार केला नाही. केवळ ‘गुरूंनी सांगितले आहे’, हा एकच विचार मनात ठेवून तिने प्रयत्न केले.’
– सौ. संगीता लोटलीकर (आई), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२४.९.२०२०)
|