कुडासे (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील भक्तांवर कृपाछाया धरणार्या श्री सातेरी-रवळनाथ देवस्थानचा जत्रोत्सव !
श्री सातेरी-रवळनाथ देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव मार्गशीर्ष कृष्ण पक्ष त्रयोदशी, ११ जानेवारी २०२१ या दिवशी साजरा होत आहे. त्यानिमित्ताने हा लेख प्रसिद्ध करत आहोत.
संकलक : श्री. उल्हास सखाराम देसाई, कुडासे, दोडामार्ग, सिंधुदुर्ग
इतिहास
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कुडासे येथील श्री सातेरीदेवीचे देवस्थान कोणत्या वर्षी स्थापन केले गेले, याची लेखी माहिती उपलब्ध नाही. हे देवस्थान कोणी स्थापन केले, यासंदर्भात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. या देवस्थानचा स्थापनकर्ता मूळपुरुष गवस उपनावाचा आहे, असे सांगण्यात येते. या गवसच्या भावाला सावंतवाडीच्या सावंत-भोसले यांच्या संस्थानातील परमे घराण्यातील परमेकर देसाईंच्या वतनदारीत देवस्कीचा सन्मान मिळाला होता. यावरूनच त्यांना ‘देसाई’ असे उपनाव प्राप्त झाले. मूळचा गवस देवस्थानच्या देवतांची पूजाअर्चा करू लागला. त्याच्यासह त्याचा दुसरा भाऊ देसाई देवस्थानचा कारभार पाहू लागला. त्याला या देवस्कीमध्ये ‘राव’ म्हणूनही संबोधतात. त्यामुळे या देवस्थानात गवस, कुळकार, देसाई, राव, सुतार, घाडी, असे प्रमुख मानकरी मानले जातात.
श्री सातेरीदेवी आणि इतर पंचायतन देवता
कुडासे गावातील श्री सातेरीदेवी ही प्रमुख पंचायतन देवता आहे. ही देवी देवालयाच्या गर्भकुडीत मुख्य आसनावर काळ्या पाषाणावर मूर्तीरूपाने विराजमान आहे. या मूर्तीचे कोरीव काम अतिशय सुंदर आणि रेखीव आहे. तिचे स्वरूप महिषासुर मर्दिनीसारखे भासते. श्री सातेरीदेवीच्या गर्भागारात देवीच्या मूर्तीजवळ घोड्यावर बसलेली आणि हातात तलवार असलेली एक शौर्यशाली अन् वीरतेची जाणीव करून देणारी पाषाणी मूर्ती आहे. ती मूळ आकारी पुरुषाची मूर्ती आहे, तसेच गाभार्यात पूर्वस (पूर्वीचा वस), मायेचा वस, कुळाचा पूर्वस, नितकारी, घाडवस, गावडे परब, कृष्णा गावस, तळखांबा, पूरु तळखांबा, ब्राह्मणी वस, पारधी वस हे देव आहेत. बाहेरच्या बाजूला बारावस, पेड्डेश्वर, शिरकाणो, ब्राह्मणी माया, जैन लिंग, केळमाया या व्यतिरिक्त श्री रवळनाथ, श्री भूतनाथ आणि श्री पावणाई यांचे एक मंदिर आहे. श्री रवळनाथदेवाच्या बाजूला मागाचो पुरुष, म्हारिंगण, वेताळ आणि लिंगनाथ हे देव आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे चव्हाटा आहे. श्री सातेरी मंदिराच्या बाजूला भक्तनिवास आहे.
गावातील इतर जागृत देवस्थाने
वामन गोसाय : देवमळा-कुडासे वाडीवर सिद्धनाथ डोंगराच्या पायथ्याशी वामन गोसाय किंवा वामन गोसाई हे दैवत आहे. घनदाट झाडांनी निर्माण झालेल्या राईत या देवतेचे निवासस्थान आहे. सदर देवचारी स्थळात चाळा असतो. भूत पिशाच्च शोधण्याचे काम सदर देवता करत असते. या देवतेचा भंडारा नावाचा उत्सव असतो. भाविक लोक या भंडार्यात नाचणीची भाकरी (रोट), उकडलेले कुळीथ आणि नारळ देवतेच्या झाडाकडे ठेवतात. ही देवता सत्प्रवृत्तीची असून भूत-पिशाच्च यांपासून लोकांचे रक्षण करते. उदा. अवगत, आडमृत्यू, अपघाती मृत्यू होऊन त्रास देणारे पिशाच्च यांना आपल्या मुठीत ठेवून सुख-शांती निर्माण करते.
पेडदो : या देवस्थानाचे स्थळ वानोशी-कुडासे आणि मणेरी या गावांच्या सीमेवर आहे. या देवाला सासुरवाशीण मुलीचा देव मानतात. परगावी दिलेली मुलगी आणि गावातील सुवासिनी महिला या देवतेची जपणूक करतात. प्रत्येक सोमवारी या देवतेच्या मंदिरात दिवा पेटवून सुख, शांती अन् समृद्धी यांसाठी गार्हाणे घालतात.
गिरोबा : भरपाल-कुडासे वाडीवर उंच घनदाट झाडीत या देवतेचे छोटेसे मंदिर बांधण्यात आले आहे. ही देवता शिमधड्यांपैकी असून भरपाल वाडीवरचे लोक या मंदिरात भजन-पूजन करतात.
राइकारी : राइकारी देवतेचे स्थळ कुडासे गावाच्या एका टोकाला वसलेले आहे. सात्त्विक वृत्तीची ही देवता गावच्या संरक्षणार्थ कार्यरत आहे.
श्री देव ब्राह्मण : कुडासे गावाच्या वानोशी वाडीत मध्यभागी या देवाचे छोटेसे मंदिर आहे. भाविकांच्या नवसाला पावणारा म्हणून या देवाची ख्याती आहे. या मंदिरात प्रत्येक सोमवारी संध्याकाळी ग्रामस्थांचे भजन होते. वर्षातून एकदा अक्षय तृतीयेच्या दिवशी देवाचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
याशिवाय प्रमुख देवतांपैकी वेताळ ही देवता रयतेच्या हितासाठी कार्यरत आहे. गाव चाळ्याला रोखण्याचे काम या देवतेकडे आहे. ही जागृत देवता असून प्रमुख देवतेस फार मोठे सहकार्य करते. त्याचसमवेत श्री देव रवळनाथ हासुद्धा प्रभावी देव आहे. ग्रामदेवतेचे काही हक्क या देवतेस आहेत. कुडासे गावामध्ये ७ दिवसांचा शिमगोत्सव होतो. यामध्ये पहिल्या दिवशी चव्हाट्यावर होळी घालतात. मळ्यामध्ये राखण्याची होळी घालतात. तिसर्या दिवशी घरोघर चोर फिरतात. मानकर्यांच्या ४ अविवाहित मुलांना झाडांची पाने दोन्ही बाजूला बांधून आणि तोंडाला रंग फासून चोराचे सोंग करून दारोदारी फिरवतात. २ दिवस रोंबाट असते. ६ व्या दिवशी सतीची पूजा होते. तिला दारोदारी फिरवतात. गवस, कुळकारी, देसाई, सुतार, घाडी यांची मुले घोडे नेसून घोडेमोडणी खेळतात. याशिवाय रामनवमी आणि श्री सातेरीदेवीचा वर्धापनदिन प्रतिवर्षी ५ मे या दिवशी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशीच्या महाप्रसादासाठी येणारा खर्च करण्यासाठी भक्तमंडळी उत्सुक असतात. पुढील वर्षाच्या महाप्रसादासाठी भाविक १ वर्ष अगोदरच नावनोंदणी करतात. मंदिराचा कारभार देवस्थान समिती पहाते. मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी देवस्थान समिती प्रयत्नशील आहे.
देवस्थान जीर्णोद्धार कार्यास सढळ हस्ते साहाय्य करण्याचे आवाहनश्री सातेरीदेवी देवस्थानाने जीर्णोद्धाराचे कार्य हाती घेतले आहे. यातील मंदिराच्या गाभार्याचे काम बहुतांश पूर्ण होत आले अहे. पुढील बांधकाम होण्यासाठी अजूनही मोठ्या निधीची आवश्यकता आहे. या कार्याला सर्व भाविक आणि दात्यांनी सढळ हस्ते साहाय्य करावे, असे आवाहन गावकरी, मानकरी, मंदिर जीर्णोद्धार समिती आणि श्री सातेरी देवस्थान उपसमिती यांच्या वतीने करण्यात आले आहे. |
जत्रोत्सवाच्या कालावधीत कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचे आवाहनयावर्षी ११ जानेवारीला होणारा वार्षिक जत्रोत्सव कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने नियमावली पाळून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जत्रोत्सवाच्या दिवशी श्री सातेरी-रवळनाथ देवस्थानच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी न करता कोरोनाच्या अनुषंगाने असलेले नियम पाळून दर्शन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. |
गावाची मुख्य देवता म्हणजे ग्रामदेवता. गावाचे संरक्षण करणे हे यांचे मुख्य कार्य होय. निरनिराळ्या साथीच्या रोगांपासून गावकर्यांचा बचाव आणि मुक्तता, तसेच गुराढोरांचे रोग किंवा शेतीवर येणारे रोग यांपासून ग्रामदेवता रक्षण करते. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘परमेश्वर, ईश्वर, अवतार आणि देव’) |