शंखवाळी तीर्थक्षेत्री पूर्वी श्री विजयादुर्गा मंदिर असलेल्या वारसास्थळी यंदा पुन्हा ख्रिस्त्यांकडून अनुमती न घेताच फेस्ताचे आयोजन !
बहुसंख्य हिंदूंच्या देशातील अल्पसंख्यांकांची अरेरावी अतीसहिष्णु हिंदू किती दिवस सहन करणार आहेत ?
पणजी, ९ जानेवारी (वार्ता.) – सांकवाळ येथील शंखवाळी तीर्थक्षेत्री पूर्वी श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर होते. शासनाने या स्थळाला आता वारसास्थळ घोषित केले आहे. शासकीय दरबारी या स्थळाला आता ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (सांकवाळचे प्रवेशद्वार) असे संबोधले जात आहे. या ठिकाणी ख्रिस्त्यांनी यंदा सलग चौथ्या वर्षी पुन्हा १६ जानेवारी या दिवशी सेंट जोसेफ वाझ यांच्या फेस्ताचे आयोजन केले आहे. फेस्ताच्या निमित्ताने ‘नोव्हेना’ला (प्रार्थनेला) प्रारंभ झालेला आहे.
सांकवाळ येथील शंखवाळी तीर्थक्षेत्रातील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या ठिकाणी (‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी) ३० डिसेंबर या दिवशी देवीच्या स्थानिक भक्तगणांनी पूजा-अर्चा आणि नामस्मरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होेते. स्थानिक ख्रिस्त्यांनी ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ ही चर्चची भूमी असल्याचा दावा करून हिंदूंचा हा धार्मिक कार्यक्रम पोलिसांवर दबाव आणून मध्येच बंद पाडला. ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी हिंदूंनी धार्मिक कार्यक्रम केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी स्थानिक ख्रिस्ती आणि भाजपच्या कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा आता शासनावर दबाव आणत आहेत. या पार्श्वभूमीवर शंखवाळी तीर्थक्षेत्रातील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या ठिकाणी घडलेल्या घटनांचा उहापोह करणे क्रमप्राप्त ठरत आहे.
सांकवाळ येथील शंखवाळी तीर्थक्षेत्रातील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या ठिकाणचा गेल्या ४६१ वर्षांतील घटनाक्रम
वर्ष १५६० : पोर्तुगिजांनी पुरातन श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर पाडले आणि मंदिराच्या प्रवेशाद्वारात ते चर्चसारखे दिसेल असा पालट करण्यात आला. या प्रवेशद्वारावर ‘क्रॉस’ लावण्यात आला.
वर्ष १९८३ : पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराचे ठिकाण शासन दरबारी वारसास्थळ म्हणून घोषित झाले आणि त्याला ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ (सांकवाळचे प्रवेशद्वार) असे संबोधले गेले.
वर्ष २०१४ : वारसास्थळाच्या १०० मीटर परिसरात ख्रिस्त्यांकडून अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आले.
वर्ष २०१५ : परिसरात असलेले वडाचे झाड स्थानिक ख्रिस्त्यांकडून शासनाच्या अनुमतीशिवाय तोडण्यात आले.
वर्ष २०१७ : पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराचे दगड भूमीखाली गाडण्यात आले.
१५ डिसेंबर २०१७ : स्थानिक नागरिक मिलन नाईक यांनी केलेल्या तक्रारीवरून पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याने ‘अवर लेडी ऑफ हेल्थ’चे फादर लुईस आल्वारीस यांना ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ हे वारसास्थळ आहे आणि लोकांना या ठिकाणी जाण्यापासून वंचित करू नये’, असा आदेश दिला. हा आदेश असतांना ‘द फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ ही ख्रिस्त्यांची भूमी असल्याचा दावा स्थानिक ख्रिस्ती आजतागायत करत आहेत.
वर्ष २०१८ : पासून प्रत्येक वर्षी शासकीय अनुमतीशिवाय सेंट जोसेफ वाझ फेस्ताचे आयोजन केले जात आहे.
वर्ष २०१८ : सांकवाळ येथील ‘अवर लेडी ऑफ हेल्थ’चे फादर यांनी वारसास्थळी जाणार्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले.
वर्ष २०१९ : पुन्हा अनधिकृतपणे फेस्ताचे आयोजन करण्यात आले. तसेच या पवित्र स्थळी गोमांस आणि डुकराचे मांस शिजवून ते खाण्यात आले. त्यामुळे या स्थळाचे पावित्र्य भंग झाले.
मार्च २०१९ : वारसास्थळी ख्रिस्त्यांनी अनधिकृतपणे ‘वॉकींग पिलिग्रीमेज’चे आयोजन केले. या वेळी शासनाने ‘वॉकींग पिलिग्रीमेज’ला अनधिकृतपणे पोलीस संरक्षण पुरवले.
जानेवारी २०२० : सलग तिसर्या वर्षी पुन्हा अनधिकृतपणे फेस्ताचे आयोजन करण्यात आले आणि यालाही अनधिकृतपणे पोलीस संरक्षण पुरवण्यात आले.
३० डिसेंबर २०२० : मार्गशीर्ष पोर्णिमेला देवीच्या स्थानिक भक्तगणांनी पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या ठिकाणी पूजा-अर्चा आणि नामस्मरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. ख्रिस्त्यांनी पोलिसांवर दबाव आणून हा कार्यक्रम बंद पाडला. वास्तविक पुरातत्व कायद्याच्या कलम १७ नुसार वारसास्थळाला भेट देण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे.
जानेवारी २०२१ : पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या ठिकाणी (वारसास्थळी) ७ जानेवारीपासून ‘नोव्हेनां’ना (प्रार्थना) प्रारंभ झालेला आहे आणि १६ जानेवारी या दिवशी या ठिकाणी फेस्ताचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून ध्वनीक्षेपक लावण्यासाठी, तसेच स्थानिक पंचायतीकडून वारसास्थळी फेस्ताचे आयोजन करण्याची अनुमती घेण्यात आलेली नाही. वर्ष २०१८ पूर्वी वारसास्थळाच्या सुमारे ५ कि.मी. अंतरावर असलेल्या शिंडोली येथील ‘सेंट जोसेफ वाझ सेंक्चुरी’ येथे हे फेस्त होत होते. प्रत्यक्षात शिंडोली येथील ‘सेंट जोसेफ वाझ सेंक्चुरी’ या भूमीच्या नावावर शासकीय अनुमती घेतली जाते आणि त्या अनुमतीवर अनधिकृतपणे वारसास्थळी फेस्ताचे आयोजन केले जात आहे. प्रशासनाला हे सर्व ज्ञात आहे; कारण ही माहिती माहिती अधिकाराखाली जिल्हाधिकारी कार्यालयातूनच मिळाली आहे.