इन्सुली येथील आर्टीओ कार्यालयात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे लावा; अन्यथा कारनामे बाहेर काढू ! – मनसेची चेतावणी
जिल्ह्यातील १०६ वाहनांची नोंदणी रहित झाल्याचे प्रकरण
|
सावंतवाडी – तालुक्यातील इन्सुली येथील उपप्रादेशिक परिवहन (आर्टीओ) वाहतूक परमिटच्या नावाखाली वाहतूकदारांकडून लूट केली जाते. येथील कार्यालयाला लावलेल्या काळ्या काचेचे नेमके गुपित काय ? असा प्रश्न मनसे तालुकाध्यक्ष तथा निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी उपस्थित केला आहे.
या वेळी गवंडे म्हणाले,
१. सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहनमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत.
२. या कार्यालयात ६ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०६ वाहनांची नोंदणी रहित झाली आहे.
३. इन्सुली आर्टीओच्या ठिकाणाहून ओव्हरलोड वाहतूक केली जाते; पण कुठलीही कारवाई होत नाही. मोठे कंटेनर थांबवले जातात आणि त्यांच्याकडून अनुज्ञप्तीच्या नावाने सहस्रो रुपये घेतले जातात. या आर्टीओ नाक्याचे उत्पन्न हे एक लाखाहून अधिक आहे.
४. इन्सुली आर्टीओ कार्यालयात तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत अन्यथा ते आर्टीओ कार्यालय बांदा टोलनाका या ठिकाणी स्थलांतरित करावे. तसे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या आर्टीओचे कारनामे आम्ही बाहेर काढू.