गोव्यात होणार्या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ऑनलाईन नावनोंदणी चालू
पणजी, ९ जानेवारी (वार्ता.) गोव्यात १६ जानेवारी ते २४ जानेवारी या कालावधीत होणार्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘ऑनलाईन’ नावनोंदणी चालू झाली आहे. या वेळी पहिल्यांदाच या महोत्सवात प्रत्यक्ष सहभाग घेणे आणि ऑनलाईन सहभाग घेणे, अशा पद्धतीने सहभागी होता येईल. त्यामुळे चित्रपटांसंबंधी उत्साही असलेले चित्रपट क्षेत्रातील विद्यार्थी, पत्रकार, आणि इतर नागरिक यांना फिल्म स्क्रिनिंग, एफ्.टी.आय.आय. कडून घेण्यात येणारे ‘मास्टर क्लासेस’ आणि ‘फिल्म अॅप्रिसिएशन क्लासेस’ हे कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने घरीसुद्धा पहाता येतील. ज्यांना ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी करायची असेल त्यांनी https://virtual.iffigoa.org संकेतस्थळावर नावनोंदणी करावी. ही नावनोंदणी केवळ ‘ओ.टी.टी. प्लॅटफॉर्म’ पुरती मर्यादित असून गोव्यात चित्रपट महोत्सवातील कार्यक्रमांना प्रत्यक्ष उपस्थित रहाण्यासाठी त्याचा वापर करता येणार नाही. ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी करणार्यांना त्यांची ओळख आणि ‘पासवर्ड’ दिला जाईल. याचा वापर करून ते या महोत्सवाशी संबंधित कार्यक्रमात सहभागी होऊ शकतील. पत्रकारांसाठी ऑनलाईन नावनोंदणी लवकरच चालू होईल. ज्या पत्रकारांना गोव्यात चित्रपट महोत्सवातील कार्यक्रमांना प्रत्यक्ष उपस्थित रहायचे असेल, त्यांनी https://my.iffigoa.org/Registrations लिंकवर १० जानेवारी २०२१ पर्यंत नावनोंदणी करावी. पत्रसूचना कार्यालयाकडून घेण्यात येणार्या सर्व पत्रकार परिषदांचे प्रक्षेपण youtube.com/pibindia या पत्रसूचना कार्यालयाच्या यूट्यूब वाहिनीवरून करण्यात येईल, तसेच या वेळी पत्रकारांना ऑनलाईन पद्धतीने प्रश्न विचारता येतील.