प्रगतीचे स्थान टिकवून ठेवणे, हे गोव्यापुढे आव्हान ! उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
गोवा विधीकार दिन साजरा
पणजी, ९ जानेवारी (वार्ता.) ‘बरीच प्रगती साध्य केल्यानंतर त्यात घसरण न होऊ देता आपले स्थान टिकवून ठेवणे, हे गोव्यापुढे आव्हान आहे, असे वक्तव्य भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले. पर्वरी येथेे गोवा विधीकार दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, सभापती राजेश पाटणेकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
व्यंकय्या नायडू पुढे म्हणाले, ‘‘गोव्याच्या यशामध्ये खाणव्यवसाय आणि पर्यटन हे २ मुख्य घटक आहेत; परंतु गोव्यातील पुढील औद्योगिक विकासासाठी भूमी उपलब्ध होण्याची मर्यादा, पर्यावरणाविषयीचे प्रश्न आणि खाण व्यवसाय आणखी वाढवता न येणे, या कारणांमुळे मर्यादा येतील. गोव्यात कृषीउत्पादन अल्प असणे, हाही एक प्रश्न असल्याचे मला सांगण्यात आले आहे. आता माहिती तंत्रज्ञान, जैविक तंत्रज्ञान यांद्वारे ‘नवीन अर्थव्यवस्थे’ने उपलब्ध केलेल्या संधी घेऊन गोव्याने प्रगतीसाठी वेगवेगळे मार्ग शोधले पाहिजेत. यासाठी अत्यंत कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असून गोव्याने अल्प वेळेत मनुष्यबळ सिद्ध केले पाहिजे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोवा शासन या आव्हानांसाठी अगोदरच योग्य उपाययोजना करण्यासंबंधी विचार करत असेल याची मला निश्चिती आहे. गोवा मुक्तीच्या ६० व्या वर्षाच्या निमित्ताने मी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या नेत्यांना आणि स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वहातो. गोव्यातील ६२ टक्के लोक नगर आणि शहरे यांत रहात असल्याने येथील बहुतांश भागाचे शहरीकरण झाले आहे.’’