शैलेंद्र वेलिंगकर यांच्यावरील अत्याचार, हा भाजपचा माझ्या विरोधातील सूडचक्राचा भाग ! – प्रा. सुभाष वेलिंगकर
पणजी (पत्रक) – गुन्हे अन्वेषण विभागाचे अधीक्षक शोभित सक्सेना यांनी माझा मुलगा शैलेंद्र वेलिंगकर याला मेळावली आदोलन प्रकरणी अटक करून केलेली अमानुष मारहाण, ही भाजप सरकार आणि पक्षाच्या उच्चपदस्थांच्या कंपूने सूडचक्राचा एक भाग म्हणून केलेल्या पूर्वनियोजित आदेशानुसारच होती, असा आरोप गोवा सुरक्षा मंचचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी येथील पत्रकार परिषदेत केला.
ते म्हणाले, ‘‘या मारहाणीत शैलेंद्रचा ‘इअरड्रम’ फाटला असून डाव्या कानाने ऐकू येणे बंद झाले आहे. त्याला हेतूपुरस्सर सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात न तपासता, म्हापशाच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मातृभाषा आंदोलन मागे घेण्याचे नाकारून ते भाजपविरुद्ध चालू ठेवले, याचा सूड आमच्या कुटुंबावर विविध मार्गांनी घेणे भाजप सरकारने २०१२ पासूच चालूच ठेवले आहे. त्यातीलच हा एक टप्पा आहे. माझ्या मुलाच्या जीविताला धोका आहे. पोलीस कोठडीत त्याचे बरेवाईट झाल्यास त्याला भाजपचे नेते उत्तरदायी रहातील.’’