‘साधकांनी कोरोना वैश्विक महामारीसारख्या संकटात भावनेच्या स्तरावर न रहाता अशा गोष्टींकडे साक्षीभावाने पहायला शिकायला हवे !’ – सद्गुरु राजेंद्र शिंदे
एका साधकाला ‘त्याच्या एका नातेवाईकाला कोरोना झाला आहे’, असे समजले. तेव्हा साधकाच्या मनात ‘त्यांच्या घरी देवपूजा करतात. ते चांगले लोक आहेत, तरी असे कसे झाले ?’, असे विचार येऊन त्याला वाईट वाटले. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी त्या साधकाला केलेले मार्गदर्शन येथे दिले आहे.
१. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन
१ अ. ‘‘व्यक्तीला होणारे आजार किंवा रोग हे त्याच्या प्रारब्धाचा भाग असतात. कर्करोग, कोरोना महामारीसारखे रोग हे प्रारब्धाचा भाग आहेत.
१ आ. साधनेच्या तीव्रतेनुसार प्रारब्ध नष्ट किंवा सुसह्य होणे : प्रारब्धाचे भोग सुसह्य होण्यासाठी अधिक साधना करावी लागते. पूजा करणे आणि देवळात जाणे, हा साधनेचा एक प्राथमिक टप्पा आहे. अशा प्राथमिक टप्प्याच्या साधनेच्या बळावर तीव्र प्रारब्ध नष्ट होऊ शकत नाही. साधनेच्या तीव्रतेनुसार प्रारब्ध नष्ट किंवा सुसह्य होऊ शकते.
१ आ १. प्रारब्ध आणि साधना
१ ई. साधना करणार्या व्यक्तीला प्रारब्ध भोगतांना देवाचे साहाय्य मिळणे
१. प्रत्येक व्यक्तीला प्रारब्धभोग हे भोगूनच संपवावे लागतात. साधना करणार्या व्यक्तीलाही प्रारब्ध भोगावेच लागते. व्यक्तीची साधना जेवढी तीव्र, तेवढी त्या व्यक्तीची प्रारब्ध भोगण्याची क्षमता वाढते. देव त्याला त्याचे भोग भोगण्यासाठी साहाय्य करतो आणि त्याचे भोग सुसह्य करतो. साधकाची साधना चांगली असेल, तर तो प्रारब्धाने निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत डगमगून जात नाही.
काही साधकांना कर्करोग झाला होता. त्यांना केमोथेरपीचे उपचार घेतांना समाजातील व्यक्तीप्रमाणे त्रास जाणवला नाही. रुग्णालयात जाणे, उपचार घेणे, यांसारख्या प्रसंगांत त्यांनी ईश्वराप्रती भाव ठेवून कृती केली. त्यामुळे त्यांना देवाचे साहाय्य मिळून प्रसंगाला सहजतेने सामोरे जाता आले. केमोथेरपीसारखे अवघड उपचार घेतांना काही साधकांनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आधुनिक वैद्यांच्या रूपात आले आहेत आणि ते केमोथेरेपीच्या माध्यमातून त्यांच्या शरिरात चैतन्य प्रक्षेपित करत आहेत’, असा भाव ठेवला. त्यामुळे काही साधकांना उपचारांच्या वेळी वेदना न जाणवणे किंवा अल्प प्रमाणात जाणवणे, अशा अनुभूती आल्या. त्यांना रुग्णालयातही श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांचे अस्तित्व जाणवले. समाजातील अन्य रुग्णांपेक्षा ते त्या आजारातून लवकर बरे झाले. काही साधकांवर उपचार करणार्या आधुनिक वैद्यांनी ‘समाजातील व्यक्तींपेक्षा साधक धैर्याने या उपचारांना सामोरे जातात. साधक औषधोपचारांना चांगला प्रतिसाद देतात आणि अन्य रुग्णांच्या तुलनेत ते अल्प वेळेत बरे होतात’, हे जाणून त्यामागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला.
१ उ. साधकांनी ‘भावनाशीलते’सारख्या स्वभावदोषावर मात करायला हवी ! : आगामी काळात कोरोना महामारीपेक्षाही पुष्कळ मोठी संकटे समाजावर येणार आहेत. अनेक संत आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितल्यानुसार येणार्या आपत्काळात जगातील जवळपास ५० टक्के लोकांना मृत्यूसारख्या संकटांना सामोरे जावे लागणार आहे. पूर, वादळ, आग, भूकंप यांसारख्या आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणात स्थावर आणि जंगम मालमत्तेची हानी होऊ शकते. त्यामुळे साधकांनी कोरोना वैश्विक महामारीसारख्या संकटात भावनेच्या स्तरावर न रहाता अशा गोष्टींकडे साक्षीभावाने पहायला शिकायला हवे. साधकांनी ‘भावनाशीलते’सारख्या स्वभावदोषावर आताच मात करून अशा संकटांकडे साक्षीभावाने पहाण्याची सिद्धता करायला हवी.’’
– (पू.) श्री. शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.९.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |