श्री महालक्ष्मीदेवीच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करणार ! – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री
कोल्हापूर, ९ जानेवारी – राज्याचे नगरविकासमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी ९ जानेवारीला श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले. देवीचे मंदिर साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असून स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असून मंदिराच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करू त्यासाठी आवश्यक प्रस्ताव देवस्थान समितीला सादर करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्यासमवेत त्यांनी दर्शन घेऊन मंदिर पहाणी केली.
श्री. क्षीरसागर म्हणाले, ‘‘मंदिर तीर्थक्षेत्र आराखडा संमत असून प्रस्तावित ८० कोटी रुपयांपैकी ९ कोटी रुपये निधी मिळाला. दगडी बांधकामाच्या छतावरील गळती रोखण्यासाठी धोकादायक पद्धतीने सिमेंटचा कोबा केला आहे. झाडांची मुळेही हानी करत आहेत. कोबा काढणे आवश्यक आहे.’’ या वेळी शिवसेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.