असात्त्विक पद्धतीने चिरलेल्या कांद्यापेक्षा सात्त्विक पद्धतीने चिरलेल्या कांद्यातून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे
आहार आणि आचार यांसंबंधी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
कांदा चिरण्याच्या विविध पद्धतीच्या संदर्भात केलेले वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !
‘कांदा हा दैनंदिन आहारातील अविभाज्य घटक आहे. न्याहारीचे पदार्थ, भाज्या, आमटी इत्यादी पदार्थांमध्ये घालण्यासाठी, तसेच डाळ-तांदुळाची खिचडी, पुलाव, पिठलं-भाकरी इत्यादी पदार्थांसह खाण्यासाठी कांदा सर्रास वापरला जातो. कांदा चिरण्याच्या विविध पद्धती प्रचलित आहेत. काही पदार्थांसाठी चौकोनी, तर काही पदार्थांसाठी उभ्या किंवा आडव्या पद्धतीने चिरलेला कांदा वापरतात. कांदा चिरतांना त्याचे लहान, मध्यम किंवा मोठ्या आकारात तुकडे करतात. सध्या उपाहारगृहांमध्ये ‘डायमंड कट’ आकारात (शंकरपाळ्याच्या आकारात कांदा चिरण्याची एक आधुनिक पद्धत) कांदा चिरण्याची पद्धत प्रचलित आहे. ‘कांदा उभ्या, आडव्या किंवा अन्य पद्धतीने चिरल्याने कांद्यावर (कांद्याच्या तुकड्यांवर) काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी १०.९.२०२० या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’
जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत उभ्या पद्धतीने चिरलेले कांद्याचे बारीक आणि जाड काप, चौकोनी लहान, मध्यम अन् मोठ्या आकारात चिरलेले कांदे, ‘डायमंड कट’ पद्धतीने चिरलेला कांदा, आडव्या पद्धतीने चिरलेला कांदा आणि कांद्याच्या गोलाकार चकत्या अशा एकूण ८ पद्धतींनी चिरलेल्या कांद्यांच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन पुढे दिले आहे.
१ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन : चाचणीतील कांद्यांमध्ये (कांदे चिरण्यापूर्वी) नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही. उभ्या पद्धतीने चिरलेले काद्यांचे जाड काप, चौकोनी मध्यम आकारात चिरलेला कांदा आणि ‘डायमंड कट’ पद्धतीने चिरलेला कांदा यांच्यामध्ये ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात आढळल्या. उभ्या पद्धतीने चिरलेल्या काद्यांच्या बारीक कापांमध्ये ‘इन्फ्रारेड’ ही नकारात्मक ऊर्जा आढळली. आडव्या पद्धतीने चिरलेला कांदा, चौकोनी मोठ्या आकारात चिरलेला कांदा आणि कांद्याच्या गोलाकार चकत्या यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही.
१ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन : चाचणीतील कांद्यांमध्ये (कांदे चिरण्यापूर्वी) सकारात्मक ऊर्जा होती आणि तिची प्रभावळ १.७१ मीटर होती. उभ्या पद्धतीने चिरलेले काद्यांचे जाड काप आणि चौकोनी मध्यम आकारात चिरलेला कांदा यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही. ‘डायमंड कट’ पद्धतीने चिरलेला कांदा आणि चौकोनी लहान आकारात चिरलेला कांदा यांच्यामध्ये अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली. आडव्या पद्धतीने चिरलेला कांदा, चौकोनी मोठ्या आकारात चिरलेला कांदा आणि कांद्याच्या गोलाकार चकत्या यांच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळली.
वरील विवेचन पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.
वरील सारणीतून पुढील सूत्रे लक्षात येतात.
अ. नकारात्मक ऊर्जा असलेले काप : उभ्या पद्धतीने चिरलेले कांद्याचे बारीक अन् जाड काप, चौकोनी मध्यम आकारात चिरलेला कांदा आणि ‘डायमंड कट’ आकारात चिरलेला कांदा यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा अत्यल्प किंवा मुळीच नसून पुष्कळ नकारात्मक ऊर्जा आहे. यातून कांदा चिरण्याच्या या चारही पद्धती असात्त्विक असून आरोग्याच्या दृष्टीनेही हानीकारक असल्याचे सिद्ध होते.
आ. अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असलेले काप : चौकोनी लहान आकारात चिरलेल्या कांद्यामध्ये अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे. कांदा चिरण्याची सदर पद्धत फारशी लाभदायी नाही. याचे कारण हे की, या पद्धतीने कांदा चिरल्यानंतर कांद्यातील सकारात्मक ऊर्जा थोडी न्यून झाली आहे.
इ. सकारात्मक ऊर्जा असलेले काप : आडव्या पद्धतीने चिरलेला कांदा, चौकोनी मोठ्या आकारात चिरलेला कांदा आणि कांद्याच्या गोलाकार चकत्या यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून उत्तरोत्तर अधिक सकारात्मक ऊर्जा आहे. यातून कांदा चिरण्याच्या या तिन्ही पद्धती सात्त्विक असून आरोग्याच्या दृष्टीने लाभदायी असल्याचे सिद्ध होते.
२. निष्कर्ष
सात्त्विक पद्धतीने कांदा चिरल्याने कांद्यावर सकारात्मक, तर असात्त्विक पद्धतीने कांदा चिरल्याने कांद्यावर नकारात्मक परिणाम होतो, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.
वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. असात्त्विक पद्धतीने चिरलेल्या कांद्याच्या तुकड्यांमध्ये त्रासदायक स्पंदने आकृष्ट होणे : पोळ्या करणे, भाजी चिरणे, भाजी शिजवणे, अन्न ताटात त्या त्या स्थानी वाढणे, जेवायला बसतांना योग्य पद्धतीने बसणे, जेवण झाल्यावर ताट योग्य पद्धतीने घासणे, यांसारखे आचार हिंदु धर्माने योग्य अन् सात्त्विक पद्धतीने करण्यास शिकवले आहेत. सध्या पाश्चात्त्य लोकांचे अंधानुकरण केल्याने अन्नपदार्थ सात्त्विक पद्धतीने बनवण्यापेक्षा त्यांच्या सुशोभीकरणाला अधिक महत्त्व दिले जाते, उदा. उपाहारगृहात गेल्यावर विविध प्रकारे कांद्यांची सजावट केलेली दिसते. त्यामध्ये पदार्थानुसार कांद्याचा तुकड्यांचा आकार पालटत असतो, उदा. भेळ असेल, तर ‘डायमंड कट’ आकारातील तुकडे, भाजी किंवा पुलाव यांसह खाण्यासाठी म्हणून कांद्याचे उभे बारीक किंवा जाड काप इत्यादी असतात. अशा विविध पद्धतींनी केलेले कांद्याचे तुकडे वरकरणी दिसायला आकर्षक दिसत असले; तरी प्रत्यक्षात त्यांच्यामध्ये (कांद्याच्या तुकड्यांमध्ये) वायूमंडलातील तमोगुणी लहरी (त्रासदायक पंदने) लगेच आकृष्ट होतात. यामुळे असात्त्विक पद्धतीने चिरलेले कांद्याचे तुकडे नकारात्मक स्पंदनांनी भारित होतात. त्यांचे सेवन करणे आरोग्यास हानीकारक आहे.
३ आ. चौकोनी लहान आकारात कांदा चिरण्याची पद्धत लाभदायी नसणे : सध्या कांदा भाजीमध्ये एकजीव व्हावा, यासाठी तो पुष्कळ लहान आकारात चिरण्यात येतो. त्यामुळे कांद्यातील जीवनसत्त्वे निघून जातात. यामुळे लहान आकारात चिरलेल्या कांद्याचा उपयोग करून बनवलेली भाजी पौष्टीक बनत नाही.
३ इ. सात्त्विक पद्धतीने चिरलेल्या कांद्याच्या तुकड्यांमध्ये सकारात्मक स्पंदने आकृष्ट होणे : आडव्या पद्धतीने चिरलेला कांदा, चौकोनी मोठ्या आकारात चिरलेला कांदा आणि कांद्याच्या गोलाकार चकत्या यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसून उत्तरोत्तर अधिक सकारात्मक ऊर्जा आहे. या पद्धतीने कांदा चिरल्यामुळे चिरण्याच्या प्रक्रियेतून निर्माण होणार्या रज-तमात्मक स्पंदनांची निर्मिती थांबते. तसेच सात्त्विक पद्धतीने चिरलेल्या कांद्याच्या तुकड्यांमध्ये सकारात्मक स्पंदने आकृष्ट होतात. सात्त्विक पद्धतीने चिरलेल्या कांद्याचा वापर करून बनवलेले पदार्थ सकारात्मक स्पंदनांनी भारित झाल्याने त्यांचे सेवन करणे आरोग्यास लाभदायी आहे.’
– सौ. स्वाती वसंत सणस, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.९.२०१९)
ई-मेल : mav.research2014@gmail.com